जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली

0
  • काबरा पेट्रोल पंपाच्या मालक, कर्मचारी व मोटरसायकल स्वारा विरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव । प्रतिनिधी

जिल्ह्यात कलम 144 लागू असताना फिरणाऱ्या मोटर सायकल स्वार व त्याच्या मोटरसायकलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून पेट्रोल भरून देणाऱ्या पेट्रोल पंप चालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आज सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिंग रोडवरील नवजीवन सुपर शॉप समोर असलेल्या काबरा पेट्रोल पंपावर ही कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव, अविनाश देवरे, भटू नेरकर, छगन तायडे, होमगार्ड स्वप्निल निकम, योगेश कोष्टी हे पथक आकाशवाणी चौकात नाका-बंदी करीत असताना अचानक गणेश नगरात राहणारे आनंदा पाटील हे मोटरसायकलवरून (MH-१९/AK-२९६५) आले. त्यांना संबंधीत पोलिस पथकाने थांबवून चौकशी केली. कलम 144 लागू असतानाही आपण बाहेर का फिरत आहात? असे विचारले असता मी पेट्रोल भरण्यासाठी आलो होतो. काबरा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले, असे आनंदा पाटील यांनी सांगितले. आपणाकडे अत्यावश्यक सेवेची पास आहे का? अशी विचारणा केली असता नकारात्मक उत्तर देऊन ओळखीमुळे पेट्रोल मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संबंधित पथक रिंग रोडवरील नवजीवन समोर असलेल्या काबरा पेट्रोल पंपावर गेले. याठिकाणी मनोज प्रेमराज काबरा आणि कर्मचारी सौ. साधना सुनील लांडगे रा. तांबापुरा हे उपस्थित होते. आपण जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेचा कोणतीही परवाना नसताना पेट्रोल का भरून दिले? या प्रश्नाचे उत्तर पंप चालक मनोज काबरा व कर्मचारी साधना लांडगे या देऊ शकला नाहीत. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली आणि कलम 144 चे उल्लंघन याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेट्रोल पंप चालक प्रेमराज काबरा, साधना लांडगे आणि मोटरसायकल चालक आनंदा गोविंदा पाटील यांच्याविरुद्ध भा.द.वि. 188, 269, 271, साथरोग नियंत्रण कायदा दोन प्रमाणे व कलम 144 आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.