जामनेर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची चौकशी न झाल्यास आंदोलन छेडणार – किशोर पाटील

0

जामनेर : – जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी विधान सभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील शेतक-यांसाठी ३ हजार सिंचन विहिरींची पोकळ घोषणा नुकतीच केली असून ना.महाजन यांनी अगोदर तालुक्यातील अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजना व सिंचन विहिरीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन छेडेले असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांनी दि.१७ रोजी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे,शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन गव्हारे,सुनिल पाटील,युवक अध्यक्ष शैलेश पाटील,विनोद माळी आदी उपस्थित होते.श्री.पाटील पुढे म्हणाले की,गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील सहाशे सिंचन विहिरींना पंचायत समिती कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता,कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे.प्रत्यक्षात मात्र सहाशे पैकी एकाही विहिरीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.टेक्सटाईल पार्कसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.पाणी पुरवठा योजनेतील ठेकेदार हे भाजपाचे पदाधिकारी असल्यामुळे सीईओनी सुरू केलेली चौकशी थांबविण्यात आली असून सिंचन विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे ना.महाजन यांनी स्वत : मान्य केले असल्यावरही त्यातील भ्रष्ट अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई का होत नाही ? असा टोला ही पाटील यांनी यावेळी लगावला.यावेळी राजेंद्र पाटील,गजानन गव्हारे व शैलेश पाटील यांनी ही शासनाविरूध्द आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.