जळगाव जिल्हयातील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा- ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

 

याबाबत जलसंपदा मंत्र्यांना माहिती देताना ॲड. रोहिणी खडसे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तापी खोरे विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळाअंतर्गत पूर्णा तापी नदीचे वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर बोदवड कुऱ्हा परिसरातील  शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी  लिफ्ट इरिगेशनद्वारे उपसुन शेतीला देण्यासाठी या महामंडळाच्या अंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या योजनांची मुहूर्तमेढ रोवली गेली. या योजनांचे काम सुरु आहे. परंतु या उपसा सिंचन योजनांचे काम पूर्णत्वास जाऊन मुक्ताईनगर, बोदवड परिसर सुजलाम सुफलाम होण्यासाठी सदर योजनांना भरीव निधीची आवश्यकता आहे. यातील मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे ८०% काम पूर्ण झाले आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर सिंचन योजनेचे काम निधी अभावी संथ गतीने सुरु आहे.

या उपसा सिंचन योजना पूर्णत्वास जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी तरी बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावर जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांनी पुढील आठवड्यात उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी ॲड.रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पं स सदस्य दिपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  तालुका अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.