जळगावात पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन

0

अमळनेर, चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार – खासदार ए. टी.पाटील
जळगाव;- केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षापासून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी लवकरच पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार असल्याची माहिती खासदार ए. टी. नाना पाटील यांनी दिली.

भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील ऑफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार ए. टी. (नाना) पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फित कापून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. श्रीमती स्वाती कुलकर्णी, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल श्री. प्रणवकुमार, अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा, डाक अधीक्षक श्री. बी. व्ही चव्हाण, शिवाजी पाटील आदि उपस्थित होते.
जळगाव जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर असून देशात होणाऱ्या प्लॅस्टिक उत्पादनापैकी 16 टक्के उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होते. तसेच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी विदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यक भासत असत. त्यावेळी त्यांना मुंबई, औरंगाबाद, नाशिक येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. आता जळगाव शहरात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाल्याने या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे यासाठी सन 2009 पासुन प्रयत्न करीत होतेा.

नवीन भागात पोस्ट कार्यालय सुरु करावे-आमदार भोळे
जळगाव जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर असून जिल्ह्याची दिवसेदिवस प्रगतीकडे वाटचाल सुरु असताना या पासपोर्ट सेवा केंद्राचा लाभ नागरीकांना होणार आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नवीन भागात पोस्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली.
भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. श्रीमती स्वाती कुलकर्णी म्हणाल्या की, केंद्र शासनाने विदेश मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व केळी पिकविण्यात देशात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होत असल्याचा आनंद वेगळा आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सुरुवातीस डाक विभाग व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुनंदा चौधरी यांनी स्वागतगीत म्हटले. उपास्थितांचे आभार अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा यांनी मानले. कार्यक्रमास सभापती पोपट तात्या भोळे, नगरसेवक उज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह पासपोर्ट विभाग, डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

खासदार पाटलांची खंत

कार्यक्रमात खा.पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर देखील मंत्रिपद मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे माझी मंत्रीपदाची संधी हुकली असल्याचे ते बोलले.

Leave A Reply

Your email address will not be published.