जळगावात कोरोनाची धडक?

0

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोना व्हायरसने जळगाव घडक दिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश लक्षणे असणारा भादली येथील व्यक्ती जिल्हा रूग्णालयातील विशेष कक्षात आज दाखल झाला. हा व्यक्ती वैष्णव देवीचे दर्शन घेवून 11 मार्च रोजी परतला होता. दरम्यान, मुंबई येथे शिक्षण घेत असलेली तरूणी आज जळगावात परतली. काही लक्षणे जाणवल्यामुळे ती स्वत: जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. या दोघांचे नमुने घेण्यात आले असून  पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली. या दोन घटनांमुळे खळबळ निर्माण झाली आहे. उद्या दुपार पर्यंत तपासणी अहवाल येणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, असोदा येथील एक व्यक्ती 9 मार्च रोजी वैष्णव देवी दर्शन आणि काश्मिरला फिरण्यासाठी गेला होता. 11 मार्च रोजी तो भादली येथे परतला. मात्र, त्याला निमोनियाची लक्षणे जाणवत होते. सर्दी, खोकला वाढल्यामुळे तो जळगाव येथील ओम क्रिटीकलमध्ये दाखल झाला होता. मात्र, त्रास कमी  होत नसल्याने येथील डॉक्टरांनी दुपारी त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वार्ड क्रमांक 13 मध्ये कोरोना रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षात दाखल करण्यात आले. या ठिकाणी पाच डाँक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी केली. त्याचे नमुने घेण्यात येवून उपचारासाठी दाखल करून घेण्यात आल्याचे डॉ.चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना सदृश आजाराचा रूग्ण दाखल झाल्याचे समजताच माध्यमांसह सर्वच यंत्रणा कामाला लागल्यामुळे भेदरलेल्या या संशयीत रूग्णाने रूग्णालयातून पळ काढल्याची चर्चा होती. याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

दरम्यान, मुंबई येथे शिक्षण घेत असलेली तरूणी जळगावी आपल्या घरी सकाळी आली. कोरोना सदृश लक्षणे जाणवल्यामुळे खबरदारी म्हणून या तरूणीसह कुटूंबियांनी थेट जिल्हा रूग्णालय गाठले. या ठिकाणी तिच्यासर्व चाचण्या घेण्यात आल्या असून नमूने पुणे येथे पाठविले जाणार आहेत. या तरूणीमध्ये गंभीर लक्षणे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याने आपण घरीच एक बंदिस्त स्वतंत्र खोलीत राखून काळजी घेवू अशी विनंती केल्याने या तरूणीला घरी जावू दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ही तरूणी मुंबईत एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. या ठिकाणीच लिप्टने खाली उतरतांना कोरोना सदृश रूग्णाच्या संपर्कात ती आली असल्याची चर्चा होती. याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

मनपा हद्दीतील चित्रपटगृहांसह शाळा बंद

राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. या आदेशाची अंलबजावणी करण्यासाठी  शहरातील चित्रपटगृहे, मनपा हद्दीतील सर्व शासकीय, खासगी शाळा, अंगणवाड्या, नाट्यगृह,व्यायामशाळा, जलतरण तलाव दि.31 मार्चपर्यंत बंद ठेवावे असे आदेश बजावण्यात आले असल्याची माहिती मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिली. शहरात आयनॉक्स,पीव्हीआर,अशोक, रिगल, मेट्रो, राजकमल चित्रपटगृहे आहेत. हे सर्व चित्रपटगृहे दुपारपर्यंत सुरु होते. मात्र, मनपा प्रशासनाने बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे दुपारच्या शो नंतर सर्व चित्रपटगृहे बंद असल्याची माहिती उपायुक्त मुठे यांनी दिली. कोरोना विषाणूमुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील हॉटेल किंवा लॉजमध्ये अनेक जण मुक्कामाला असतात.  विदेशातून किंवा अन्य मोठ्या शहरातून  प्रवासी मुक्कामाला आल्यास त्यांची माहिती मनपा प्रशासनाला कळवावी असे आदेश शहरातील हॉटेल, लॉज चालकांना दिले असल्याची माहिती मनपाचे प्रमुख  वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.