जळगावातील सुवर्णबाजार इतिहासात प्रथमच अक्षय्य तृतीयेला बंद राहणार

0

जळगाव : देशभरात सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख निर्माण करणारा सुवर्णबाजार इतिहासात प्रथमच या अक्षय्य तृतीयेला बंद राहणार आहे. कोरोना संसर्गामुळे गुढीपाडव्यानंतरचे हे मुहूर्तही वाया जाणार असल्याने यादिवशी होणारी तीस कोटींची उलाढाल ठप्प राहील, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, काही सुवर्णपेढ्यांचे हक्काचे ग्राहक व्यावसायिकांशी संपर्क करून सोने खरेदीची इच्छा व्यक्त करीत आहेत, मात्र ते शक्‍यच नसल्याने त्यांना नकार दिला जात आहे.

अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. खानदेशात आखाजी म्हणून लौकिकप्राप्त असलेल्या या सणाचे वेगळे महत्त्व आहे. या सणाला काही वस्तू खरेदी केल्यास ती अक्षय्य राहते, असे मानले जाते. त्यामुळे या मुहूर्तावर सोने-चांदीसह प्लॉट, घरे, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुवर्ण खरेदीला यादिवशी वेगळे महत्त्व असल्याने मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी होते. दरवर्षी साधारण 25-30 कोटींची उलाढाल सुवर्णबाजारात होते. यंदा मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे एकट्या सुवर्णबाजारात 30 कोटींची उलाढाल होऊ शकणार नाही. साडेतीन मुहूर्तांमधील पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडवा सणही लॉकडाउनमध्ये वाया गेला होता. आता अक्षय तृतीयेचा मुहूर्तही वाया जाणार असल्याने सणासुदीला अर्थचक्र थांबलेले असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.