जल जीवन मिशनअंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामे दर्जेदार करावी – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

0

बुलडाणा : जल जीवन मिशन अंतर्गत दरडोई 55 लीटर पाणी पुरवठयाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार पाणी पुरवठा योजनांवर काम करण्यात येत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात 65 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. त्यांना जिल्हा समितीने मान्यता दिली असून या सर्व योजनांची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज जल जीवन मिशनची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्षा तथा खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्ष सौ मनिषा पवार, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशनमध्ये घेण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना ह्या जुन्याच असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, योजनांची नावे बदलण्यात येत असून मिशनमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. या योजनांवर करोडो रुपये खर्च होतात. परंतु पाणी टंचाई कायम राहते. त्यामुळे ही कामे दर्जेदार करण्यात यावी. योजनेत घेण्यात आलेल्या गावांची पाणी टंचाई संपुष्टात यावी. पाणी पुरवठा संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून पुढील बैठकीत सर्व तक्रारींचा सुस्पष्ट अहवाल तयार करून सादर करावा. जिल्ह्यातील एकही गाव पाणी पुरवठा योजनेतून सुटता कामा नये, अशा सुचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, तसेच 2024 पर्यंत मिशनमधील योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी यंत्रणांनी कामाचा वेग वाढवावा. दर्जेदार कामे करावी. योजना पूर्ण करून 100 टक्के  घरांना पाणी मिळाले पाहिजे.  तर भविष्यात पाण्याची समस्या वाढणार असून त्या दृष्टीने प्रयत्न करावे असेही खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले.

याप्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.