जनतेच्या मनातले स्थान महत्त्वाचे – प्रवीण दरेकर

0

दोनशे गरीब कुटुंबातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

मुंबई :- पद,प्रतिष्ठा,सत्तास्थान येतात-जातात मात्र, जनतेच्या हृदयातले स्थान हे महत्त्वाचे असते. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या मनात असेच स्थान निर्माण केले असल्याचे गौरवोद्गार विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी काढले.

माजी. जल संधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भव्य सामुदायिक विवाह सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. सावंत यांचा मुलगा व पुतण्या या समवेत जवळपास दोनशे गरीब कुटुंबातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा भव्य स्वरूपात संपन्न झाला.या सामुदायिक विवाह सोहळ्यास लाखोंची उपस्थिती होती.

या प्रसंगी श्री. दरेकर म्हणाले, जगभरात लाखो विवाह सोहळे संपन्न होतात.विवाहसोबत नोकरी हा देखील महत्त्वाचा विषय आहे.याच पार्शवभूमीवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित जोडप्यांना  नोकरी देण्याची जबाबदारी या सोहळ्यानिमित्त आयोजकांनी घेतली आहे.हा क्षण दुर्मिळ असल्यामुळे ही बाब महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जावी.

महाराष्ट्रातील राजकारणात अल्पावधीत लोकप्रिय झालेले सावंत हे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे.मराठवाडा आणि उस्मानाबादमधील प्रश्नांबाबत ते कसलीही तडजोड करत नाहीत.सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी ते अथक प्रयत्न करतात.त्यांच्या प्रयत्नांने निश्‍चितच मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील वॉटरग्रीड सारख्या योजनेसाठी त्यांनी घेतलेली भूमिका मराठवाड्यातील जनतेला भावली असल्याने त्यांना मराठवाडा जनतेचा जनाधार मिळाल्याचे दरेकर म्हणाले.

या सामुदायिक विवाह सोहळ्यास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजे बापू पाटील,आमदार प्रसाद लाड,राजा रणजीत सिंह,आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री महादेव जानकर,आमदार कैलास पाटील, सुरजित सिंह ठाकुर तसेच राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते

फडणवीस यांच्या शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा चे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या सामुदायीक विवाह सोहळ्यास फोन वरून शुभेच्छा दिल्या.भाजपची राज्य कार्यकारिणी आज नवी मुंबईत सुरू असल्यामुळे फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत. फडणवीस यांनी शुभेच्छा देताना आमदार तानाजी सावंत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.त्यांच्या शुभेच्छा उपस्थिती जनसमुदयाला ध्वनीपेक्षकांच्या माध्यमातून ऐकविण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.