घरकूलच्या पार्श्वभूमिवर लोकप्रतिनिधींचा सावध पवित्रा !

0

घनकचरा प्रक्रिया प्रस्ताव वगळता सर्व विषय मंजूर; शिवसेना तटस्थ

जळगाव- घरकूल प्रकरण निकालाच्या पार्श्वभूमिवर महानगरपालिकेच्या  स्थायी सभेत लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेत घनकचऱ्याचे बायोमायनिंग व प्रकल्प उभारणीचे दोन विषय तहकूब ठेवत आयत्या वेळच्या विषयांसह सर्व विषयांना सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिली. मात्र  नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याच्या खर्चास मान्यता व 5 कोटीच्या विकास कामांना मान्यतेचे विषय वगळता सर्व विषयांवर शिवसेनेने तटस्थतेची भूमिका घेतली.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा  बुधवार दि. 4 रोजी दुपारी 3 वा. प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती जितेंद्र भगवानराव मराठे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे,उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त हर्षल गुट्टे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, लेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरसचिव  सुनिल गोराणे आदी उपस्थित होते.

सभेत अजेंड्यावरील 12 विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. त्यापैकी घनकचऱ्याशी संबंधीत दोन विषय तहकूब ठेवण्यात आले. तर शिवसेना व एमआयएमच्या सदस्यांनी तटस्थतेची भूमिका घेतली.

बायोमायनिंगचा विषय स्थगित ठेवा- उज्वला बेंडाळे

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आव्हाणे शिवाऱ्यातील पुर्वीपासून कचरा साठविला आहे. त्याच्या बायोमायनिंग प्रक्रिया निविदा एजन्सीचे कामाची तपासणी करुनच द्या तोपर्यंत स्थगित ठेवण्याची भूमिका नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी मांडली. ग्लोबल कंपनीनेच कराड येथील मनपातील काम घेतले होते. सदर कंपनीचे काम थांबविण्यात यावे असे पत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान समितीत असताना आपण दिले असल्याचे बेंडाळे यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना लक्ष केले. त्यामुळे अभ्यास करुन निर्णय घ्यावा. तसेच नुकत्याच झालेल्या घरकूल निर्णयाच्या पार्श्वभूमिवर सतर्क राहून निर्णय घ्यावा असे त्यांनी सुचित केले.

मजीप्रचा विचार करता प्रस्ताव मान्य करावा- आयुक्त

कराड येथे 1970 मध्येच भुयारी गटारी करण्यात आल्या आहेत. तेथे ऑक्सिडेशन पॉण्ड तयार केल्यामुळे तेथील कचऱ्याचे बायोमायनिंग होवू शकले नाही. तसेच सदर कंपनीचे कोल्हापुरात चांगले काम आहे.  घनकचऱ्याचा विषय 2017 मध्ये सुरु होवून अडीच वर्षाचा कालावधी लोटला असून केंद्रशासनाने निधी देवून ठराविक वेळ दिलेला आहे.मजीप्रने काम सुरु करण्ाच्या सूचना दिल्या आहेत.  मजीप्रची समिती येवून पाहणी करणार आहे. सुदैवाने एल वन चे कमी दराचे टेंडर आहे.

कमी थकबाकीदारांच्याच घरासमोर वाजले डफडे- नितीन बरडे

थकबाकीची रक्कम कमी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर डफडे वाजविण्यात आले असून मोठ्या थकबाकीदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवक नितीन बरडे यांनी केला. शहरात एवढेच थकबाकीदार आहेत काय? असा सवाल त्यांनी विचारला असता ही प्राथमिक यादी असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.त्यावर तीन चार वर्षापासून बाकी असलेल्या ठेवीदारांची यादी करण्यात आल्याची माहिती उपायुक्त गुट्टे यांनी दिली.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा 1 नोव्हेंबरनंतर?

सध्या शहराला तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. तो दोन दिवसांआड करण्याच्या निर्णयाबाबत व तीन दिवसांच्या नियोजनाने किती टक्के पाण्याची बचत झाली? त्याचे रेकॉर्ड आहे का? असा सवाल नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी विचारला असता पाणी पुरवठा अधिकारी डी. एस. खडके यांनी  पाणी बचतीचे रेकॉर्ड आहे. सध्या वाघूर धरण 55 टक्के भरलेले आहे. जिल्हास्तर पाणी वाटप 1 नोव्हेंबरनंतर सुरु होते. तेव्हा धरण 50 टक्के भरलेले अपेक्षित असते. त्याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चेअंती निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाचपटच्या दंडाबाबतही तटस्थ- विष्णू भंगाळे

पाचपटचा दंड अन्यायकारक असून तो एकपट करावा, असा ठराव मागील महासभेत करण्यात आला आहे. त्या ठरावावर सह्या करणाऱ्या नगरसेवकांचे धाबे दणाणले असल्याची बातमी प्रसारमाध्यमात झकळल्यामुळे शहराच्या विकासात आमची आडकाठी नसून त्या प्रस्तावाबाबत आमची तटस्थतेची भूमिका असल्याचे विष्णू भंगाळे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.