ग.स.तील सत्ताधारी सहकार गटाला धक्का

0

जळगाव जिल्हास्तरावर असलेल्या 100 वर्षाच्या जुन्या ग.स. सोसायटीत बी.बी. पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार गटाला पूर्ण 21 सदस्यांचे बहुमत आहे. ग.स.च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला अवघे एक वर्ष शिल्लक असतांना सत्ताधारी सहकार गटात उभी फूट पडली. 21 संचालकांपैकी 11 संचालक फुटले अन् सहकार गटाचे नेतृत्व अध्यक्षपदाच्या निवडीवरून झुगारले. मंगळवार दि. 14 रोजी सहकार गटाची निवडणूक होऊन आगामी वर्षासाठी उदय पाटील अध्यक्ष आणि ज्ञानेश्वर सोनवणे उपाध्यक्षपदासाठी एकमताने ठरले. त्या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. बुधवार दि. 15 मे च्या अंकात सर्वच वृत्तपत्रात तशा आशयाच्या बातम्या प्रकाशित झाल्या. आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेआधी सहकार गटाचे नेते बी.बी. पाटील यांचे नेतृत्वात बैठक सुरु झाली. या बैठकीत सहकार गटातील संचालकांचा उदय पाटलांच्या अध्यक्षपदाला विरोधथ असल्याचे सांगितले. तेव्हा अध्यक्षपदाची उमेदवारी बदलावी असा आग्रह करण्यात आला. तथापि बी.बी. पाटील यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे 21 पैकी 11 संचालकांनी अध्यक्षपदासाठी मनोज पाटील यांचे नाव सुचविले आणि उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांचे नाव सुचविले आणि या दोघांचा अर्ज दाखल केला. अध्यक्षपदी मनोज पाटील हे 1 मताने तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे हे 3 मताने विजयी झाले. 21 पैकी 11 संचालक सहकार गटातून फुटले त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि सहकार गटाला मोठा धक्का दिला. संचालक मंडळाच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी 1 वर्ष शिल्लक असतांना हे नाट्य घडल्याने सहकार गट अल्पमतात आल्याने त्यांना आता विरोधकांची भूमिका बजवावी लागणार आहे.

100 वर्षाची पार्श्वभूमि असलेल्या ग.स. सोसायटीने अनेक चढउतार पाहिले आहेत. परंतु अशा प्रकारे एकसंघ असले त्या सहकार गटात अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्य निवडीवरून उभी फूट पडण्याचा हा पहिलाच प्रकार म्हणता येईल. संचालक मंडळाच्या निवडणुकीत एक दोन तीन पॅनेल मैदानात उतरतात सत्तेवर आलेल्या गटाला विरोधकांकडून जोरदार धारेवर धरले जाते तथापि अशा प्रकारची उभी फूट पडण्याचे राजकारण आता सहकारात सुरु झाले ही बाब गंभीर म्हणावी लागेल. ग.स. सोसायटीचे सुमारे 40 हजार सदस्य आहेत. यामध्ये सरकारी निमसरकारी नोकरदार वर्ग सभासद आहेत. त्यात सर्वाधिक मोठी संख्या शिीकांची आहे. त्यामुळे शिक्षक सभासदांवर यांची पकड आहे तो गट ग.स. वर सत्ता गाजवी शकतो अशी परिस्थिती आहे. सहकार गटात फूट पडल्यानंतर नवे अध्यक्ष झालेले मनोज पाटील हे शिक्षकच आहेत. यापूर्वी खिरोदा येथील मुख्याध्यापक तुकाराम बोरोले हे सुद्धा अध्यक्ष होते. आता मनोज पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीत तुकाराम बोरोले आणि विलास नेरकर माजी अध्यक्षांचा सिंहाचा वाटा आहे. या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राजकारणातील बडी हस्ती सहकार रायमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यात तंर्थ्यांश असले तरी गुलाबरावांनी मात्र ते नाकारले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सहकारातील एक मोठी संस्था आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याचबरोबर आता सहकारी संस्थातही प्रथमत:च घोडेबाजार झाल्याचा आरोप सहकार गटाचे नेते बी.पी. पाटील यांनी केला आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी फक्त एक वर्ष शिल्लक असल्याने वहात्या गंगेत संचालकांनी हात धुवून घेतले  असे म्हटले तर त्यात वावगे काय? परंतु जे काही चालले आहे ती बाब चिंताजनक म्हणता येईल.

ग.स. सोसायटीचे सर्व सभासद सुशिक्षित आहेत. सोसायटीच्या माध्यमातून सभासदाचे हित साधण्याचा प्रयत्न संचालक मंडळाकडून अपेक्षित असते. परंतु अलिकडे सभासदांच्या हिताऐवजी स्वहित साधण्याकडे अधिक कल दिसून येतो. सभासद हे सर्व नोकरदार असल्याने त्यांच्या पगारातून कर्जाची 100  टक्के वसुली होते. त्यामुळे कर्ज वसुलीची समस्या ग.स. च्या प्रशासनाला कधीच भेडसावणारा नसतो त्यामुळे इतर पतसंस्थांप्रमाणे ग.स.ची आर्थिक स्थिती कधीच डळमळीत होत नाही. त्यामुळे ग.स. सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय राबविणे शक्य आहे. परंतु अलिकडे राजकारणाचा वास येतो. ही संस्था बळकावण्यासाठी अथवा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. सहकार गटाचे नेते बी.पी. पाटील यांनी ग.स. सोसायटीचे वेगळेच नाते निर्माण झालेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ग.स. सोसायटीशी ते तन – मनाने जोडले आहेत. आपल्या सहकारी गटाचे संपूर्ण 21 सदस्य संख्या असतांना आर्थिक अमिषापोटी जी उभी फूट पडली त्यामुळे बी.बी. पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. अशा प्रकारे फूट पडल्याने ते व्यथित झाले आहेत. सहकार गट एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी सुद्धा तडजोड करायला हवी होती. आपले कट्टर समर्थक असलेल्या उदय पाटलांचा अध्यक्षपदाचा आग्रह सोडून दुसर्यााला संधी द्यायला हवी होती.तसे केले असते तर सहकार गट एकसंघ राहिला असता एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.