गावपातळीवरील कामकाजात कार्यक्षम नेतृत्वातूनच सुसुत्रता – आ. डी. एस. अहिरे

0

गांधी रिसर्च फाउंडेशन, यशदातर्फे सरपंचांच्या शिबीराचे उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी

ग्रामीण विकासातून भारत सक्षम राष्ट्र होऊ शकतो. यासाठीच महात्मा गांधीजींनी खेड्यांकडे चला हा मंत्र दिला. गावपातळीवरील नेतृत्व कार्यक्षम असेल तर कामकाजात सुसुत्रता आणता येईल; यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) यांच्यातर्फे आयोजीत सरपंचांचे क्षमता बांधणीचे प्रशिक्षण शिबीर प्रभावी ठरेल असा विश्वास आमदार डी. एस. अहिरे यांनी व्यक्त केला.

जैन हिल्सच्या आवारातील गांधी रिसर्च फाऊंडेशन व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत थेट निवडुन आलेल्या सरपंचांचे क्षमता बांधणीचे ‘मी सरपंच… मी लोकसेवक…’ हे तिन दिवसीय निवासी प्रशीक्षण आजपासून सुरू झाले. या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन साक्री येथील आमदार डी. एस. अहिरे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी यशदाच्या सत्र संचालीका अनिता महिरास, पंचायती राज्य प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य रमेश चौधरी, प्राचार्य अतुल महाजन, प्रशिक्षक डॉ. भाऊसाहेब महिरास, सुधीर पाटील आदि उपस्थीत होते. प्रशिक्षणासाठी धुळे, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 70 सरपंचांची उपस्थीती होती. आजपासून सुरू झालेल्या प्रशिक्षण शिबीराचा समारोप 3 जून ला होणार आहे.

याप्रसंगी गाव पातळीच्या कामकाजात लोक नियुक्त सरपंचे कश्यापद्धतीने सुसुत्रता आणु शकतात या संबंधी डी. एस. अहिरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच यशदाच्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ह्या प्रशिक्षणानंतर सरपंचांना निर्णय घेण्यास व कार्यक्षमता वाढविण्यास निश्चीत मदत होईल. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक निलेश पाटील, नितीन चोपडा, योगेश पाटील, अविनाश अहिरे यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी व यशदाचे सहकारी सहकार्य करीत आहेत. सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.