गटातटाच्या दलदलीत चोपडा शिवसेना रुतली!

0

कैलास पाटलांच्या कार्यक्रमात चंदूअण्णांना डावलले

नंदलाल मराठे
चोपडा, दि. 30 –
तालुका शिवसेनेत उघड दोन गट पडले असून दि. 1 जून रोजी माजी आमदार कैलास पाटील यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पत्रिकेत कुठेही आ. चंद्रकांत सोनवणे यांचे नाव नसल्याने समर्थक बुचकाळ्यात पडले आहेत. विद्यमान आमदारांना डावलून माजी आमदार मात्र काय साध्य करीत आहेत हे अद्यापही कळत नसल्याने तालुका शिवसेना मात्र गटातटाच्या दलदलीतच फसली आहे. मित्र पक्ष असलेला भाजप मात्र तालुक्यात आपले पायेमुळे रोवण्यात यशस्वी होत आहे.

वरिष्ठ पातळीवरून दखल आवश्यक
तालुक्यातील या दोन नेत्यांच्या वादावर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी दखल घेणे आवश्यक आहे. तालुक्यात सेनेची मोट भक्कम आहे ती सैल होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या असे होईल. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विकास कामांचा आलेख उंचावला असला तरी गटा-तटाचे राजकारण अडसर ठरु शकतो.

दि .1जून रोजी माजी आमदार कैलास पाटील यांचा वाढदिवस असून चोपडा शहरातील गिरीराज लॉनवर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची तयारी सुरु असतांना दुसरीकडे मात्र सेनेतील वादाने वादळ उभे केले आहे . तोंडावर लोकसभा व विधानसभा निवडणूका असून सेनेतील हा वाद फटका देणारा आहे. कैलास पाटील हे रावेर लोकसभा मतदार संघातून इच्छूक असून तसा जनसंपर्क त्यांनी वाढविला असून त्या दृष्टीनेच या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र स्वपक्षाच्या विद्यमान आमदाराला डावलून होत असलेला कार्यक्रम डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्‍चित! आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या विजयात कैलास पाटलांचा सिंहाचा वाटा होता. वर्ष -दीड वर्षातच त्यांच्यात ठिणगी पडली आणि गटा-तटाचे राजकारण सुरू झाले. याचा परिणाम शिवसेनेला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दिसून आला. हा वाद असाच विकोपाला जात राहिला तर आगामी निवडणूका शिवसेनेला जड जातील हे पूर्वानुभवावरून स्पष्ट होते. चंद्रकांत सोनवणे यांनी सुरुवातीपासून माजी आमदार कैलास पाटील यांना प्रत्येक कार्यक्रमात मानसन्मान दिला मात्र अचानकपणे दोघांमध्ये ठिगणी पडल्याने पक्ष एक मात्र विस्तार अनेक अशी स्थिती झाली आहे. याच कारणाने शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाने मात्र ही संधी साधत ग्रामीण भागात आपले जाळे उभे करुन विस्तार सुरु केला असून त्यांना जि.प व पं.स निवडणुकांमध्ये मोठे यशही प्राप्त झाले आहे. तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असला तरी गटातटाच्या दलदलीने दुही माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.