खामगाव न.प. व जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण प्रकरणी तक्रारकर्त्याची दिशाभूल

0

खामगाव(प्रतिनिधी)- स्थानिक प्रभाग क्रमांक 11 मधील गोपाळनगर भागात न.प.च्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमण प्रकरणी अमरावती सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांनी दखल घेतली असून जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे. तक्रारकर्त्याने उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगाव न.प. हद्दीतील प्रभाग क्र. 11 मधील गोपाळनगर भागात गजानन शंकर डाहे व उमेश शंकर डाहे यांनी न.प. मालकीच्या रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाबाबत स्थानिक नागरिक गणेश भेरडे हे जिल्हा प्रशासन व खामगाव न.प.कडे सन 2016 पासून तक्रार करून पाठपुरावा करीत आहे.

मात्र खामगाव नगर परिषद व जिल्हा प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत गणेश भेरडे यांनी नगरविकास मंत्रालयासह अमरावती आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे 18 मार्च 2021 रोजी तक्रार केली होती. कारण याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे 8 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रार केली असता यासंदर्भात जिल्हा नगर विकास शाखेकडून 17 मार्च 2021 रोजी प्राप्त पत्रात तक्रारीचा विषय एक (नाली बांधकाम) व मजकुराचा विषय दुसर्‍या तक्रारीचा (अतिक्रमण) टाकून सदर प्रकरण नस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

त्यामुळे प्रशासनाकडून दिशाभूल होत असल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी गणेश भेरडे यांनी अमरावती विभाग आयुक्त यांना 18 मार्च 2021 रोजीच्या निवेदनानुसार केली होती. न्याय न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावून न्याय मागण्यात येईल व न्यायालयीन प्रक्रियेसाठी येणार्‍या खर्चास खामगाव न.प. व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले होते. तसेच सदर तक्रारीची योग्य चौकशी करून अतिक्रमण हटविण्यात यावे व नागरिकांना रहदारीसाठी रस्ता मोकळा करावा अशी विनंतीही भेरडे यांनी निवेदनात केली होती. या निवेदनाची दखल घेत अमरावती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त यांनी उपरोक्त आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

मुख्याधिकारी अकोटकर यांची किमया!
खामगाव न.प. मध्ये सध्या सावळागोंधळ सुरू आहे. न.प. जागेवर अतिक्रमण करणारे व बोगस बांधकाम करणार्‍या ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. आतापर्यंत लक्ष्मी मोहापायी तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी त्यांचे लाड केले. पण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले मनोहरराव अकोटकर खामगाव न.प. मुख्याधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर शहरातील जनतेला न्याय मिळेल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. पण कशाचे काय? त्यांनीही मागील मुख्याधिकारी यांचे खरकटे काढून ठेकेदारांचे चांगभल करण्याची भूमिका पार पाडली, असे न.प.वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांना खामगाव न.प. मुख्याधिकारी सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेचे अधिकारी म्हणून पदभार मिळाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांचा कारभार आहे, त्यातच खामगाव नगर परिषद मधील अतिक्रमण वा ठेकेदारासंदर्भात तक्रारी झाल्यास हेच महाशय तेथून सरळ प्रकरण नस्ती करतात. विशेष बाब म्हणजे त्यांना सर्वकाही माहिती असते, पण कोरोना महामारीचा काळ पुढे करून आपली नोकरी सांभाळण्या सोबतच माया देणार्‍यांची पाठराखण करण्याची भूमिका हे बजावत असल्याचा आरोप होत असून याबाबतही अमरावती सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.