खामगाव न.प. बांधकाम विभागाचा अफलातून कारभार

0

खामगाव | (गणेश भेरडे) : 
नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार ठेकेदारच सांभाळत असल्याची बाब समोर आल्यानंतर न.प.ची लक्तरे वेशीवर तर टांगल्या गेलीच यामध्ये खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कशी निर्माण होत आहे. याबाबतची माहिती समोर आली आहे. न.प. चा ठराव व कार्यारंभ आदेश एकच असतांना मात्र इस्टिमेट मध्ये बदल करून बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे बोलले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार न.प. बांधकाम विभाग ठेकेदाराशी संगनमत करून आर्थिक लाभासाठी नामी शक्कल लढवित असल्याचे सांगण्यात येते. शहरातील कोणतेही विकास काम करायचे असल्यास नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत बहुमताने ठराव पारित करण्यात येतो. त्यानुसार कोणत्याही विकासात्मक बांधकामाचे इस्टीमेट तयार करून बांधकामाचा कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात येतो. वास्तविक पाहता कोणतेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यास इस्टिमेटनुसार बांधकाम झाली नसल्याची ओरड होते. येथे मात्र ठेकेदाराच्या संगनमताने अफलातून शक्कल लढविली जात आहे. न.प.चा ठराव व कार्यारंभ आदेश काहीही असो मात्र इस्टिमेट ठेकेदाराच्या सोयीनुसार बनविण्यात येते. अशाच एका प्रकरणात प्रस्तुत प्रतिनिधीने मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकार यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित काम इस्टिमेट नुसार झाले असून कार्यारंभ आदेश देण्यात बांधकाम विभागाची चुकी झाली असावी, असे तोंडी सांगितले. तर न.प.च्या ठरावाला व कार्यारंभ आदेशाला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण हा सर्व काही घाट संबंधित ठेकेदारांचे बिल काढण्यासाठी घातला जातो, अशी चर्चा न.प. वर्तुळात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.