खामगाव नगर पालिकेकडून स्वच्छतेचा देखावा अर्थात फोटो सेशन

0

सार्वजनिक शौचालयाजवळ औट घटकेचे सुशोभिकरण व झगमगाट

खामगाव (गणेश भेरडे)– घाटपुरी नाका भागातील सार्वजनिक शौचालयाजवळ काल 25 मार्च रोजी रात्री शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवून व विद्युत दिव्यांचा झगमगाट करून औटघटकचे सुशोभिकरण करण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत स्थानिक नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित न.प. अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वच्छता सर्वेक्षण चे पथक येणार असल्याची माहिती दिली. तर स्थानिक नागरिक फोटो सेशन पुरता हा देखावा करण्यात आल्याचे बोलत होते.

शहर किती ही अस्वच्छ असले तरी मागील सरकारच्या काळात खामगाव नगर पालिकेला राज्य व विभागीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे. परंतु स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ शहर स्पर्धेत सहभागी होणारी शहरे स्पर्धेच्या अवघे काही दिवस आधी तयारी करीत असल्यामुळे स्वच्छ शहर स्पर्धेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही महिन्यांनी स्वच्छतेसंदर्भातील अहवाल स्पर्धेत सहभागी झालेल्या शहरांना द्यावा लागणार असून काही निकषांवर आधारित हा अहवाल असेल. त्यामुळे आता स्वच्छतेचा देखावा पालिकेला करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छ खामगाव, सुंदर खामगाव ही संकल्पना प्रत्यक्षात येणार की, हा पुन्हा स्वच्छतेचा देखावाच होणार हा प्रश्न कायम आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवर्षी देशातील शहरांसाठी स्वच्छ शहर ही स्पर्धा केंद्र सरकारकडून घेण्यात येते. या स्पर्धेत दरवर्षी पालिकेकडूनही सहभाग घेतला जातो. मात्र शहर स्वच्छतेबाबतच्या उपाययोजना केवळ स्पर्धेपुरत्याच केल्या जात असल्याचे, स्पष्ट झाले होत आले आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेच्या उपाययोजना वर्षभर कायम राहाव्यात, या हेतूने सहभागी शहरांचे मानांकन वेळोवेळी करण्यात येणार असून याबाबत पालिकेला अहवाल द्यावा लागणार असून त्यासोबतच काही निकषांची पूर्तता करावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठीच काल केंद्रीय पथक शहरात दाखल होणार असल्याने उपरोक्त देखावा निर्माण करण्यात आल्याची चर्चा न.प. वर्तुळात आहे.

मुख्याधिकारी अनभिज्ञ
यासंदर्भात आज 26 मार्च रोजी मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दाखवून पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे मॅडम यांच्याशी संपर्क साधुन विचारणा करण्यास सांगितले. यावर पांडे मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वच्छता सर्वेक्षण पथक दाखल होण्याबाबत दुजोरा दिला तर अधिक माहिती विचारली असता ठेवणीतील उत्तरे दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.