कोरोना : आयएमएकडून मदतीचा हात, 5 व्हेंटीलेटर देणार

0

बुलडाणा (लोकशाही)ः डॉक्टरांची कमतरता, संसाधनांचा अभाव, जीर्ण ईमारती, अस्वच्छता अशा एक ना अनेक समस्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असूनही आज कोरोनाशी लढण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नाईलाजास्तव का होईना पण मैदानात उभे आहे. पीपीई कीट, मास्क यांचा मोठा तुटवडा तर आहेच परंतु हजारोंचे बळी घेणार्‍या कोरानाविरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ एकच व्हेंटीलेटर असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्हा मुख्यालय बुलडाण्यात कोरोना आतापर्यंत 5 कोरोना संसर्गीत आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला. अशा बिकट परिस्थीतीत इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या बुलडाणा शाखेने स्थानिक खाजगी डॉक्टरांच्या सहकार्याने 5 व्हेंटीलेटर जिल्हा रुग्णालयाला पाठविण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. शासनाकडून 15 नवे व्हेंटीलेटर येण्यास किती अवधी लागू शकतो, हे सांगता येणे शक्य नाही. परंतु सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून आयएमएने उचललेले पाऊल बुलडाणेकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे. एक व्हेंटीलेटरची किंमत 5 लाख रुपयांपासून सुरु होते.इंडीयन मेडीकल असोसिएशन संपूर्ण भारतातील डॉक्टरांची मातृसंस्था आहे.

कोराना विरोधातील लढाईत आयएमएचे सरकारला मोठे सहकार्य मिळत आहे. बुलडाण्यातील आयएमएचे प्रदेश प्रतिनिधी तसेच प्रसिद्ध नाक-कान-घसा तज्ञ मागील आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात भरती झाले होते. यादरम्यान त्यांनी कोरोना आयसोलेशन वार्डाची दयनीय अवस्था पाहिली.. पंखा नाही, अस्वच्छ संडास-बाथरूम, बेसीनमध्ये नळ नाही, दोनच बेड आणि मच्छरांचा उच्छाद त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. एकच व्हेंटीलेटर असल्याने दोन रूग्ण आले तर त्यातील एक दगावणार, अशी वस्तुस्थिती मांडणारा डॉ. जे.बी.राजपूत यांचा व्हीडीओ अनेक ठिकाणी शेअर झाला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या बकाल अवस्थेवर चहूबाजूंनी टिकेची झोड उठली होती. कोरोनाच्या काळात कुठलाही रुग्ण, मग तो श्रीमंत असो की, गरीब त्याला जिल्हा रुग्णालयात जावे लागणार आहे. शासकीय नियमानुसार खाजगी ईस्पीतळांमध्ये कोरोना संशयीत किंवा बाधित रुग्णांना भरती करून घेता येता नाही. परंतु जिल्हा रुग्णालयातील अव्यवस्था पाहून आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी चिंता व्यक्त केली. लिंगाडे अर्बनचे संचालक तसेच सामाजिक जाण-भान ठेवून काम करणारे धीरज लिंगाडे यांनी जिल्हा रुग्णालयाला व्हेंटीलेटर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.

आयएमएचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. जे.बी. राजपूत, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे ओएसडी प्रविण कथने, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, आयएमएचे इतर पदाधिकारी, शहरातील नामांकीत डॉक्टर यांच्यात विस्तृत चर्चा झाली. शहरात काही मोठी दवाखाने आहेत, ज्यांच्याकडे व्हेंटीलेटर आहेत. त्यांच्याकडून व्हेंटीलेटर घेण्याचा निर्णय झाला. डॉ. दीपक लद्धड, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. सोळंकी, आशिर्वाद हॉस्पीटल, सहयोग हॉस्पीटल यांनी बुलडाणेकरांचे हित लक्षात ठेवून होकार दर्शविला. दोन दिवसांत 5 व्हेंटीलेटर जिल्हा रुग्णालयात स्थापित केले जाणार आहे. एव्हढेच नव्हे तर व्हेंटीलेटर ऑपरेट करण्यासाठी संबंधीत खाजगी हॉस्पीटलचे डॉक्टर सेवा देण्यासाठीही तयार असल्याचे आयएमएने जिल्हा रुग्णालयाला कळविले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी आयएमएने देवू केलेल्या मदतीचे सहर्ष स्वागत केले आहे.

कोरोना संकटकाळात शहरातील प्रत्येकच नागरिकाने बुलडाणेकर म्हणून जे जे योगदान देता येईल, ते दिले पाहीजे, अशी भावना धीरज लिंगाडे आणि डॉ. जे.बी. राजपूत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आणखी 15 नवे व्हेंटीलेटर जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळणार असल्याची माहिती डॉ. पंडीत यांनी  दिली आहे. तर शासनाकडून पीपीई कीट आणि मास्क उद्यापर्यंत जिल्हा रुग्णालयाला मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.