कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज ; जिल्ह्यात 11 हजार 243 बेड तयार

0

जळगाव (प्रतिनिधी) : – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती तयारी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदशर्क सुचनांनुसार जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन व उपचारार्थ जिल्ह्यात आवश्यक उपकरणांसह 11 हजार 243 बेडची तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्रिस्तरीय उपचार पध्दती अवलंबून त्यानुसार आवश्यक ती तयारी ठेवण्याच्या सुचना शासनामार्फत प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील नागरीकांना अशा परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात. याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा रुग्णालयाला आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण 78 कोरोना कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेंटरमध्ये 9 हजार 142 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यात 23 कोविड हेल्थ सेंटर स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये 1 हजार 41 बेड उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कोविड हॉस्पीटलचे 10 युनीट असुन त्यामध्ये 1 हजार 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधी साठा उपलब्ध आहे.
तालुकास्तरावर करोना कोविड केअर सेंटरमार्फत रुग्णांचा चांगले उपचार व व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी व्यवस्थापन समिती नेमण्यात आलेली आहे. या कोविड केअर सेंटर समितीमध्ये तालुकास्तरावर तहसीलदार हे अध्यक्ष आहेत. तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपंचायतचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक, महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य आहेत. तर वैद्यकिय अधिक्षक हे सदस्य सचिव आहेत.
या सेंटरमध्ये सौम्यस्वरुपाच्या आजारांचे रुग्ण दाखल करण्यात येणार असून त्यांचे स्वॅबही याचठिकाणी घेतले जाणार आहे. यामुळे रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही व रुग्ण ज्या ठिकाणी असेल त्याठिकाणी असलेल्या करोना सेंटर येथेच त्यास सेवा पुरविण्यात येतील. या कोविड केअर सेंटरमध्ये शासनाने नेमुन दिलेले कम्युनीटी मेडीकल ऑफिसर तसेच, आरबीएसके, आयुष, सीएचओ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, औषध निर्माता व सफाई कर्मचारी, वाहन चालक, लॅब टेक्नीशियन हे 24 तास शिफ्ट ड्युटीमध्ये कार्यरत असणार आहे.
कोविड केअर सेंटर रुग्णांकरीता शासनामार्फत बेड, गाद्या, उशीसह लाईट व इतर सुविधा मुबलक स्वरुपात उपलब्ध असणार आहे. याठिकाणी नगरपालिकेतर्फे पाण्याची सोय व साफसफाईची सोय करण्यात येणार असुन महसुल खात्यामार्फत रुग्णांना जेवण्याची सोय करण्यात येत आहे. तसेच या कोरोना कोविड केअर सेंटर येथे फिवर क्लिनीकची सुरवात करण्यात आलेली असुन यात सौम्य स्वरुपाचा ताप, सर्दी आणि खोकला यावर उपचार केले जातील व गरज असल्यास रुग्णांना दाखलही करुन घेण्यात येईल. ज्या रुग्णांना गंभीर किंवा अतिगंभीर लक्षणे आढळतील अशा रुग्णास योग्य त्या उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखला करुन उपचार करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ आरोग्य विभाग व्यवस्थापन सुसज्ज आहे. शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या कोरोना सेंटर येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी भेटी देवून पाहणी करण्यात येवून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे. असे डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, कोविड नोडल ऑफिसर, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.