कोरड्या दुष्काळा पाठोपाठ ओल्या दुष्काळामुळे एरंडोल तालुक्यातील शेतक-यांचे डोळे पाणावले,पंचनामे सुरु

0

एरंडोल प्रतिनिधी |  तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात जवळपास तिन आठवड्यांपासून सतत पडणा-या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.हात तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.ज्वारी,बाजरी,कापुस,मका,सोयाबीन व इतर खरीप पिके पावसाच्या पाण्याने सडली आहेत.३१ तारखेपासून तालुका प्रशासनातर्फे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे.मुंबईला मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असुन त्यानिमित्ताने होणा-या राज्यस्तरीय राजकीय मंथनात मग्न असलेल्या राजकारण्यांना राज्यात ओला दुष्काळ व शेतक-यांचे ओले डोळे याचा विसर पडला कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एरंडोल तालुक्यात ऑक्टोबर अखेर १३३ टक्के पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.अजुनही पाऊस पिच्छा सोडत नाही.रोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसुन येते.तालुक्यात एकुण ८१९ मि.मि.पाऊस झाला आहे.विशेष हे कि यंदाच्या पावसाळ्यात उत्तरार्धा मध्ये पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे.ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या सततच्या पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे.त्यामुळे एरंडोल तालुक्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगामावर अक्षरशःपाणी फेरले आहे.दरम्यान आमदार चिमणराव पाटील यांनी तत्परता दाखवुन तालुका प्रशासनाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी सुद्धा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना कळविले आहे.३० ऑक्टोबर रोजी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी तलाठी,कृषी सहाय्यक व कृषी विस्ताराधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन पंचनामे करण्याबाबत नियोजन केले व ३१ ऑक्टोबर पासुन तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी पंचनामे करण्याचे काम सुरु केले आहे.

दरम्यान एरंडोल तालुक्यात बाधित शेतक-यांची संख्या २५ हजार ३१,कोरडवाहू कापुस ७२६५ हेक्टर,ज्वारी ८६६ हेक्टर,बाजरी ५० हेक्टर,मका ३९७२ हेक्टर,सोयाबीन १४१२ हेक्टर,कापुस ६७८५ हेक्टर या प्रमाणे एकुण २० हजार ३५० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल तालुका कृषी कार्यालयाने जिल्हाधिका-यांकडे पाठविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.