केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ ते खडगपूर रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

0

जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ ते पश्चिम बंगालधील खडगपूर दरम्यानच्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली. ‘भुसावळ ते खडगपूर कॉरिडॉर’ हा जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने शिक्षण, व्यापार, उद्योगाच्या माध्यमातून विकासाला चालना देणारा ठरणार आहे. सोबतच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर या मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करून तो बोदवडपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील या दोन्ही बाबी जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत.

भुसावळ-खडगपूर कॉरिडॉर अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा असणार आहे. पश्चिम बंगालमधील खडगपूर हे शहर औद्योगिकदृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. आयआयटीमुळे देखील शहराला विशेष असे महत्त्व असल्याने ही घोषणा जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य गनी मेमन यांनी व्यक्त केली आहे.

भुसावळ ते खडगपूर कॉरिडॉर शिक्षण, व्यापार तसेच उद्योगाच्या अनुषंगाने एक मोठी बाब आहे, असेच म्हणता येईल. या कॉरिडॉरसाठी नेमकी किती कोटी रुपयांची तरतूद झाली आहे किंवा हा कॉरिडॉर कसा असेल? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पिंक बुक काही दिवसांनी प्राप्त होईल. तेव्हा भुसावळ ते खडगपूर हा कॉरिडॉर कसा असेल, याची माहिती मिळेल. मात्र, या कॉरिडॉरची घोषणा होणे, हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे, असे म्हणता येईल, असे गनी मेमन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.