काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश! राज्यपालांनी दिले गेहलोत सरकारला अधिवेशन बोलवण्याचे आदेश

0

जयपूर । गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या संघर्षता वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. विशेषतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आक्रमक झालेले बघायला मिळाले. राज्यपालांनी सुरूवातील नकार दिल्यानंतर संपूर्ण काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश मिळालं असून राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिवेशन न घेण्याचा हेतू कधीच नव्हता असंही राज्यपालांनी गेहलोत यांना म्हटलं आहे.

तत्पूर्वी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानातील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं होतं. राजस्थानमध्ये पायलट विरूद्ध गेहलोत असा संघर्ष सुरू असताना राज्यपाल कलराज मिश्र यांनी अधिवेशन बोलावण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे हा संघर्ष राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा सुरू झाला. मागील तीन चार दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, राज्यपालांकडून वारंवार अधिवेशनाची मागणी फेटाळण्यात आली.

त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसनं सर्व राज्यातील राजभवनासमोर निदर्शनं केली होती. त्याचबरोबर गेहलोत सरकारनं राज्यपालांना अधिवेशन बोलावण्यासंदर्भात सुधारित प्रस्तावही दिला होता. मात्र, त्यात काही उणीवा दाखवत राज्यपालांनी हा प्रस्तावही परत पाठवला. दरम्यान, राज्यपालांनी अधिवेशन बोलवावं म्हणून काँग्रेस आमदारांनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिलं होतं. त्याचबरोबर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता. त्यानंतर दुपारी राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्य सरकारला अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.