कर्नाटकमधील सहकारी बॅंकेचा माजी सीईओ आढळला मृतावस्थेत

0

बंगळूर -कर्नाटकमध्ये एका सहकारी बॅंकेचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्याच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळला. आर्थिक घोटाळ्यावरून संबंधित बॅंक विविध यंत्रणांच्या रडारवर आली असतानाच माजी सीईओच्या संशयास्पद मृत्युमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, माजी सीईओने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
वासुदेव मईया असे कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते गुरू राघवेंद्र सहकारी बॅंकेचे माजी सीईओ होते. बंगळूरमधील एका रस्त्यालगत पार्क करण्यात आलेल्या कारमध्ये सोमवारी रात्री मईया यांचा मृतदेह आढळला.

विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या बॅंकेतील आर्थिक घोटाळा चालू महिन्याच्या प्रारंभी उघडकीस आला. त्यावरून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) गुरू राघवेंद्र बॅंकेवर कडक निर्बंध लादले.

त्यामुळे बॅंकेच्या ठेवीदारांमध्ये आणि ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. त्या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हाती घेतला. त्यानंतर एसीबीने मईया यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर छापे टाकले होते. त्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मईया मृतावस्थेत आढळले.

Leave A Reply

Your email address will not be published.