ओबीसीना आरक्षण मिळाले पाहिजे भुसावळात भाजपाचे चक्काजाम

0

भुसावळ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकार्‍यांनी व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ग्रामीण रुग्णालयाजवळील भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या पेट्रोल पंपासमोर शनिवारी सकाळी 11.30 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्ग काही वेळेसाठी ठप्प झाला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला केले. सुमारे अर्धा तास आंदोलनकर्त्यांनी प्रसंगी घोषणाबाजी केली.

ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, आमदार आगे बढो, भाजपाचा विजय असो, ओबीसी की शान मे भाजपा मैदान में, आघाडी सरकार करतय काय खाली डोकं वर पाय, महाविकास आघाडीचा धिक्कार असो आदी घोषणांनी परीसर प्रसंगी दणाणला होता. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे आदींसह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. महामार्ग रोखण्यात आल्याने 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली.

मराठा समाज आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असो महाविकास आघाडी सरकारने खोडा घातला असल्याचा आरोप यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केला. ते म्हणाले की, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणही या आघाडी सरकारने थांबवले असून सर्वच समाजावर अन्याय या सरकारने केला आहे. सर्व समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी आजचे आंदोलन असल्याचे आ सावकारे  यांनी सांगितले .

यावेळी आंदोलनात आमदार संजय सावकारे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजू खरारे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अमित आसोदेकर, अमोल महाजन, साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे, फेकरीचे प्रशांत निकम, अजय नागराणी, सतीश सपकाळे, प्रकाश बतरा आदी सहभागी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.