ऐन उन्हाळ्यात सुप्रिम व एमआयडीसीत पाणी प्रश्न पेटला!

0

गेल्या 15 दिवसांपासून परिसरात पाण्याचा ठणठणाट
जळगाव -उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सुप्रिम कॉलनी परिसर व एमआयडीसी परिसरातील वसाहतीत पाणी प्रश्न पेटला आहे. गेल्या 15 दिवसांपासून परिसरात पाण्याचा ठणठणाट आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून मुद्दाम दुर्लक्ष?
सुप्रिम कॉलनी व एमआयडीसी परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी थेट महानगरपालिका गाठत आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी 15 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असून पाणीपुरवठा विभागाकडून मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला
सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
सुप्रिम कॉलनी व एमआयडीसी भागात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे परिसरातील आबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे परिसरातील चाकरमान्यांचे वेळेचे नियोजन नेहमीच कोलमडत असते. नोकरीधंद्यानिमित्त होणार्‍या धावपळीत पाण्यासाठी वेगळी धावपळ करावी लागते. यामुळे चाकरमान्यांचा नोकरी धंदा तसेच मुलांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उंच भागामुळे पाणी पुरवठा होत नाही
सुप्रिम कॉलनी व एमआयडीसी परिसर उंचावर असल्याने परिसरात पाणी पुरवठा होत नसल्याचे अधिकारी म्हणतात असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत असून नागरिकांना पाणी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विकत घ्यावे लागत आहे. यासंदर्भात नगरसेविका जिजाबाई भापसे यांच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक गणेश सोनवणे नगरसेविका लताबाई चंद्रकांत सोनवणे, सुरेश भापसे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
रात्री होतो पाणीपुरवठा
सुप्रिम कॉलनीला रात्री पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यातही शहरात पाणी पुरवठा बंद असल्यावर पाणी पुरवठा करता येतो. पुर्वी 3/4 दिवसांआड पाणी येत होते. गेल्या काही दिवसांपासून 15 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. शहरात पुरवठ्यात कपात केली तर सुप्रिम कॉलनी परिसराला पाणी मिळू शकते.
पाणी पुरवठ्याला आचारसंहितेची अडचण
रेमंड येथे बुस्टर आहे तेथे जोडून द्यावे, अशी मागणी आहे मात्र रेमंड ते सुप्रिम हे अडीच किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रेशर येणार नाही. सदरील प्रकरणी मनपा अभियंता डी.एस. खडके यांनी हायवेवरुन सम तयार करुन मग शिफ्ट करुन पाणी पुरवठा करता येईल, असा सल्ला दिला त्यालाही दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्याचप्रमाणे सदर कामाला आचारसंहितेचीही अडचण असल्याची माहिती सुरेश भापसे यांनी दिली. दरम्यान अमृत योजनेचे काम चालू आहे त्याअंतर्गत सम करायला लावले तर त्याच्याआधी पाणीपुरवठा होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सुप्रिम कॉलनी पाणी प्रश्नी लवकरच तोडगा
औद्योगिक वसाहतील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना निवेदन दिले. यावेळी आ. राजुमामा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेविका जिजाबाई भापसे नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक गणेश सोनवणे नगरसेविका लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्यात संयुक्त बैठक होवून आ. राजुमामा भोळे यांनी पाणीप्रश्नी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.