एमआयडीसीतील बालाजी तेल कंपनी आगीच्या भक्षस्थानी

0

जळगाव – शहरातील एमआयडीसी परिसरात बालाजी फार्मा कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीला शॉर्टसर्किटने भिषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. या भिषण आगीत तेलाच्या टाक्या, तयार तेल यासह साहित्य खाक होवून एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महापालिका व जैन इरिगेशनच्या 10 ते 12 अग्निशमन बंबाव्दारे पहाटे 4 वाजेच्या सुमारास भीषण आग आटोक्यात आली.

रिंगरोड परिसरातील यशवंत कॉलनी येथील पराग शांतीलाल सुरतवाला वय 37 यांच्या मालकीची एमआयडीसी परिसरात सेक्टर डी 32 मध्ये बालाजी फार्मा कॉर्पोरेशन नावाची तेलाची कंपनी आहे. कंपनीत केसांना लावायाचे तेल तयार होते. या कंपनीच्या मागील बाजूस रॉ मेटरियल स्टोरेज एरिया आहे. 2 जुलै रोजी नेहमीप्रमाणे काम आटोपून कंपनी रात्री 8 वाजता बंद झाली. रात्री 11.15 वाजेच्या सुमारास सुरतवाला यांना त्यांच्या कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या शाईन मेटल कंपनीचे मालक मोहम्मद गिलाणी यांचा फोन आला. त्यांनी सुरतवाला यांनी तुमच्या कंपनीतून धुर निघत असल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरतवाला यांनी तातडीने घटना अग्निशमन विभागास कळविली. व घटनास्थळ गाठले.

भिषण आग असल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंब अपुर्ण पडत होते. अखेर जैन इरिगेशनचे अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. महापालिका व जैन इरिगेशन अशा एकूण 10 ते 15 अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा केल्यानंतर तब्बल चार ते पाच तासानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली. या आगीत खाली कागदी खोके, प्लॅस्टिक लॅमीनेटस, प्लॉस्टिकच्या खाली बाटल्या व कॅप, पत्र्याचे शेड, तेलाच्या टाक्या व तेल तसेच कंपनी आवाराती भिंत असे एकूण अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीबाबत पराग सुरतवाला यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यावरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.