एकाला वाचविताना तिघांनी गमावला जीव ; जळगाव एमआयडीसीमधील घटना

0

जळगाव : सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून एका पाठोपाठ दोन कामगार व एक ठेकेदार असा तिघांचा मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स या कंपनीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन कोळी (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर) अशी मृतांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंठा चौफुलीला लागूनच असलेल्या आयोध्यानगर रस्त्यावरील जुन्या एमआयडीसीतील ए सेक्टरमध्ये प्लाॅट क्र‌. ८४,८५ मध्ये सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मिती करण्याची कंपनी आहे. अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर ही कंपनी आहे. यात २० ते २५ मजूर रोज कामाला आहेत. शनिवारी कंपनीला सुट्टी असल्याने मालक सुबोध चौधरी यांनी मयूर विजय सोनार व दिलीप सोनार यांना कंपनीचे वेस्टेज केमिकल्स व सांडपाणी साठवण्याची टाकी साफसफाई करण्यास सांगितले होते. या टाकीत केमिकल मिश्रित चिखल व गाळ होता. टाकीत साफसफाई करीत असताना दिलीप सोनार यांचा वरुन पाय घसरला व ते या सांडपाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच रवींद्र कोळी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. टाकीतून हात धरून ओढत असताना कोळी हेच खाली खेचले गेले व त्यामुळे ते देखील टाकीत बुडाले. हे पाहून मयूर याने धाव घेतली व दोघांना वाचवण्यात तोही टाकीत बुडाला. अवघ्या दहा मिनिटात तिघे  या टाकीत बुडाले. इतर कामगारांनी तातडीने धाव घेऊन तिघांना बाहेर काढले.मालवाहू टेम्पो मधून जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले.

सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांच्या श्वासनलिकेत केमिकलयुक्त घाण,  सांडपाणी व गाळ अडकला व त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.

कंपनी मालक ताब्यात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळावरील टाकी तसेच संपूर्ण कंपनीची पोलिसांनी पाहणी केली. कामगारांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. संभाव्य वाढ लक्षात घेता कंपनी मालक दोघा भावांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.