आसोद्यात दंगल; पोलिस पथकावर दगडफेक, १९ अटकेत

0

जळगाव – येथून जवळ असलेल्या असोदा येथे सरपंचाच्या मुलाने ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान या  दंगल प्रकरणी पोलिसांनी स्वत: फि र्यादी होऊन दोन्ही गटाच्या ४५ जणांविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावात रात्रभर धरपकड मोहिम राबवून १७ जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

आसोदा येथील सरपंच नबाबाई दौलत बिऱ्हाडे यांचा मुलगा संजय बिऱ्हाडे हा शनिवारी सायंकाळी ७ वाजता पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे पंपावर काम करणाऱ्या अमोल गोपाळ कोळी याच्यासोबत त्याचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान रात्री दंगलीत झाले. रात्री ९.३० वाजता आसोदा गावातील वाल्मीकनगर, धनजीनगर या भागात जमाव जमला होता. बिऱ्हाडे व कोळी यांनी समाजाचे लोक बोलावून वाद वाढवला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला चढवला होता. यात पवन अरुण सोनवणे व राहुल दिलीप सोनवणे हे दोघे जखमी झाले. पोलिस पाटील आनंदा सुपडू बिऱ्हाडे यांनी ही माहिती तालुका पोलिसांना दिली. यानंतर सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, उपनिरीक्षक कदीर तडवी, अरुण सोनार, साहेबराव पाटील, नितीन पाटील, ईश्वर लोखंडे, धर्मेंद्र ठाकूर यांचे पथक आसोद्याला रवाना झाले. समोर २०० जणांचा जमाव शांत करीत असताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. जमाव शांत होत नसल्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवला हाेता. हा फौजफाटा आसोद्यात पोहोचण्याच्या अाधीच जमावाने थेट पोलिसांवर दगडफेक केली. काही पोलिसांना धक्काबुक्कीही झाल्याने पोलिस कर्मचारी विजय लोटन पाटील हे जखमी झाले. त्यांच्या डाव्या पायावर दगड लागला. आरसीपी प्लाॅटून गावात दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या जमावावर नियंत्रण मिळवता आले. यानंतर विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील सुमारे २०० जणांवर दंगल व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.