आरोग्य सहाय्यकाच्या बॅंक खात्यातील ७२ हजार लंपास

0

 पाचोरा (प्रतिनिधी) : सर्वत्र दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढत आहे. मोबाईलवर फोन करून बॅंक अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून मोबाईल बॅंक खात्याची माहिती घेत अनेकांना गंडविण्यात आल्याचा घटना घडत आहेत. दि. २ मार्च रोजी अशाच सायबर क्राईमचा प्रकार घडला असुन एका इसमाच्या बॅंक खात्यातील ७२ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध सायबर क्राईमचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील शिवकाॅलनी रहिवासी तथा पिंपरखेड ता. भडगांव येथील आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले ब्रिजलाल नथुलाल पांडे (वय – ५७) यांचे मोबाईल (क्रं. ९८५००२५०२०) वर दि. २ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ९८८३२८७४७१ या क्रमांवरुन फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने आपले नाव दिपक शर्मा असे सांगत मी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा येथुन बोलत आहे. आपले बॅंकेचे के. वाय. सी. अपडेट नसुन आपल्या खात्यातुन हजार रुपये कपात करण्यात आले असल्याचे सांगत आपले बॅंक खाते बंद होवु शकते. तुमच्या मोबाईलवर एक कोड नंबर आला असेल तो सांगा जेणेकरून आपले बॅंक खाते सुरु राहील. यावर ब्रिजलाल नथुलाल पांडे यांनी कोड नंबर सांगितला.

काही वेळातच ब्रिजलाल पांडे यांचे बॅंक खात्यातुन अनुक्रमे २५ हजार रुपये, १० हजार रुपये, १६ हजार रुपये, १ हजार रुपये व २० हजार रुपये असे ७२ हजार रुपये कपात झाले. ब्रिजलाल पांडे यांनी तात्काळ त्यांना आलेल्या क्रमांकावर फोन केला असता सदरील मोबाईल क्रमांक बंद होता. ब्रिजलाल पांडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात इसमा विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.