आज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

0

मुंबई : बॅंक कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. विलिनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र बाहेर काढले आहे. महाराष्ट्रातील व्यापारी बॅंका मंगळवारीदेखील बंदच राहणार आहेत. राज्यातील बॅंका सलग तिसऱ्या दिवशी बंद राहणार असल्याने खातेदार, ठेवीदार, ग्राहकांचे हाल कायम आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरण विरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारला म्हणजेच आज एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तसेच व्यापारी बॅंकांच्या घसरत्या ठेवी दरांविरोधातही तीव्र मत प्रदर्शित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारच्या सुटीला विधानसभेसाठीच्या मतदानाची सुटी लागू झाल्याने महाराष्ट्रात मात्र सलग तिसऱ्या दिवशी व्यापारी बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे.

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन आणि बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाने मंगळवारच्या संपाची हाक दिली असून विविध 10 ते 12 कर्मचारी, अधिकारी संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत. रिझर्व्ह बॅंक, स्टेट बॅंक तसेच क्षेत्रीय ग्रामीण बॅंका तसेच खासगी व सहकारी बॅंकांचे कर्मचारी, अधिकारी मंगळवारच्या संपात सहभागी होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध सार्वजनिक बॅंकांचे चार बॅंकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. 1 एप्रिल 2020 पासून त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने होण्याची शक्‍यता आहे. विलिनीकरणाविरोधात संघटनांनी गेल्या महिन्यातही संपाची घोषणा केली होती. मात्र लागून येणाऱ्या सुटीच्या पाश्वभूमीवर संपामुळे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून तो बॅंक व्यवस्थापनाच्या आवाहनानंतर मागे घेण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.