अवैध वाळू वाहतूक करणारे 179 वाहने कारवाईविना पडून

0

जळगाव :- प्रशासनाने जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर यासारखी 179 वाहने पकडली आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ही वाहने तहसील कार्यालय, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा आहेत. यापैकी 120 वाहनांना तर मालकच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ज्या 59 वाहनांचे मालक निष्पन्न झाले, त्यांनीही या वाहनांकडे ढुंकून पाहिलेले नाही. त्यामुळे ही वाहने भंगारात विक्री होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांविरुध्द तसेच वाळूविरुध्द प्रशासनाने वेळोवेळी कारवाया केलेल्या आहेत.प्रत्येक कारवायांमध्ये वेगवेगळे कारणे आहेत, असे असतानाही आज प्रशासनाच्या डोळ्यादेखत बंदी असतानाही शहर व जिल्ह्यात वाळूची वाहतूक होत आहे. सहा महिन्यात अवैैध वाळू वाहतूक करताना 179 वाहने पकडण्यात आली व ही वाहने त्या-त्या तालुक्याच्या तहसील, प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देखील अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने आहेत.

ना क्रमांक, ना चेसीस

पकडण्यात आलेल्या वाहनांमध्ये 120 वाहनांना क्रमांकच नाही. विना क्रमांकाचेच वाहने धावत होती. आणखी खोलात गेले तर या वाहनांना चेसीस क्रमांकही नसल्याचे उघड झाले. त्यामुळे वाळूमाफियांकडून अशीच वाहने व्यवसायात वापरली जातात. प्रशासनाने वाहने पकडली तर त्याच्या मुळ किमतीपेक्षा दंडाचीच रक्कम जास्त असते, त्यामुळे दंड भरण्याच्या नादात न पडता अशी वाहने वाजयावर सोडून दिली जातात.

वाळू वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांची चोरी झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून नेहमीच डंपर व ट्रॅक्टर चोरी झालेले आहेत. वारंवार वाहने चोरी होणे व त्याच वाहनांचा वाळू व्यवसायासाठी वापर होणे असे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत, त्यामुळे प्रशासनाकडेच संशयाची सुई फिरायला लागली होती. वाहने चोरी प्रकरणात चालकांवरच गुन्हे दाखल झालेले आहेत. कारवाई करणाजयांनी असो कि तपासी अमलदारांनी मालकापर्यंत पोहचण्याची तसदी घेतलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.