अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स, दोन्ही पीए अटकेत

0

मुंबई : 100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन अनिल देशमुख अडचणीत आहेत. अनिल देशमुख यांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केल्यानंतर देशमुखांना आज ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान,देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

एप्रिल महिन्यात आधी अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. 25 जून रोजी ईडीने अनिल देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची धडक कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश आहे. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकला आहे. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारत तसेच त्यांचा CA राहत असलेल्या वरळी येथील घरी देखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीची सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक अशी ही कारवाई केली जात असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवनांचं एक पथकही घटनास्थळी दाखल होते.

Leave A Reply

Your email address will not be published.