अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार !

0

मुंबई: उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आमदारांच्या आग्रहामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्र विकास आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असताना अजित पवार यांनी थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात राजकीय भूकंप झाला होता. मात्र अवघ्या ३ दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राजीनामा दिला. त्यामुळे भाजपा सरकार कोसळलं.

बंडखोरीमुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार नाही, अशी चर्चा होती. बंडाची शिक्षा म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवलं जाईल. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांचे विश्वासू असलेल्या जयंत पाटील यांना संधी देण्यात आली, असं म्हटलं जातं होतं. मात्र आमदारांचं समर्थन, प्रशासनावर असलेली मजबूत पकड यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल. मात्र ते आज उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.