डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्‍का;महाभियोग प्रस्तावास मंजुरी

0

वॉशिग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्‍का बसला आहे. कारण त्यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावास हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या मुद्द्यावर बुधवारी तब्बल 10 तास चर्चा करण्यात आली. 230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याविरोधातील दुसरा प्रस्तावही सभागृहात मंजूर करण्यात आला.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता सीनेटमध्ये हा प्रस्ताव नेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातच सीनेटमध्ये यावर चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सीनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्‍यता कमी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

बिदेन यांना निवडणुकीत हानी पोहोचवण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनकडून मदत घेतली व नंतर त्यांना त्या बदल्यात अमेरिकेकडून वेगळ्या स्वरूपात मदत दिली. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही त्यामुळे यात अध्यक्षांना जबाबदार धरलेच पाहिजे. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदायमीर झेलेनस्की यांच्यावर दबाव आणून त्यांना बिदेन व त्यांचे पुत्र हंटर यांची चौकशी सुरू करण्यास भाग पाडले. बिदेन व त्यांच्या मुलांचा युक्रेनमध्ये उद्योग व्यवसाय आहे याबाबत एका जागल्याने ट्रम्प यांनी 25 जुलैला झेलेन्स्की यांना केलेल्या फोन कॉलच्या आधारे तक्रार दिली होती.

आपल्यावरील महाभियोगाची कारवाई रद्द करावी अशी मागणी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्याकडे केली होती. या महाभियोगात डेमोक्रॅट सदस्यांनी अधिकारांचा अभूतपूर्व असा घटनाबाह्य वापर केला आहे. अमेरिकेच्या संसदीय इतिहासात आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते. घटनात्मक प्रमाणित सिद्धांतानुसार सभागृहाच्या न्याय समितीने यात दाखल केलेली कलमे समजण्याच्या पलीकडे आहेत. यात सगळ्या प्रकाराचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून त्यात कुठला न्यायिक शहाणपणा नाही, यात आपण कुठलाही गुन्हा केलेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोग शब्दाचा अर्थच गमावला असून त्याची गंभीरता नष्ट झाली आहे,असे ट्रम्प म्हणाले होते.

या अवैध महाभियोगाला मान्यता देऊ न तुम्ही राज्यघटनेला स्मरून जी शपथ घेतली आहे त्याचे उल्लंघन केले असून अमेरिकेतील लोकशाहीविरोधात युद्ध पुकारले आहे. महाभियोग प्रक्रियेत आपल्याला बाजू मांडण्याचा अधिकार न देता न्याय प्रक्रियेचा भंग केला आहे. ज्या जागल्याने ही तक्रार दाखल केली त्याने अफवा पसरवली होती त्याच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नव्हते. युक्रेनच्या अध्यक्षांना जो दूरध्वनी करण्यात आला होता त्यात दबाव आणण्याशी काहीच संबंध नव्हता,असेही त्यांनी नॅन्सी पेलोसी यांना उद्देशून म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.