अखेर ४० तासांच्या प्रयत्नांनंतर उजनी धरणातील सहा मृतदेह सापडले!

0

सोलापूर! लोकशाही न्युज नेटवर्क –

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना वादळी वाऱ्याने बोटीचा अपघात झाला. २१ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवासी बोट बुडून  सहा जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली. १७ तासांनंतर ही बोट सापडली मात्र बुडालेले प्रवासी बेपत्ता होते. एनडीआरएफकडून (NDRF) त्यांचा शोध सुरु होता. अखेर ४० तासांच्या शोधकार्यानंतर सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सहावा मृतदेह सापडला.

ही दुर्घटना २१ मे रोजी सायंकाळी घडली होती. त्यादिवशी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं ही घटना घडली.

बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावाचा काठ गाठला. ते पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्यानंतर बचावकार्य सुरु झालं. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. काल दिवसभर शोधकार्य करुनसुद्ध एकही मृतदेह हाती लागला नव्हता. मात्र, आज सकाळी पाच मृतदेह NDRF च्या जवानांना सापडले होते. त्यानंतर राहिलेला एक मृतदेह देखील शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. अखेर ४० तासांनंतर NDRF चं शोधकार्य संपलं आहे.

दरम्यान, या बोटीत करमाळा तालुक्यातील झरे येथील एक दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले, कुगाव येथील एक तरुण, एक बोट चालक आणि राहुल डोंगरे नावाचे पोलीस उपनिरीक्षक होते. या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३० वर्षे), कोमल गोकुळ जाधव (वय २५ वर्षे), शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३ वर्षे) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय ३५ वर्षे), गौरव धनंजय डोंगरे (वय १६ वर्षे, दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.