श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग- 24
त्याचा दास मी अंकित

जाणे भक्तीचा जिव्हाळा I
तो ची देवीचा पुतळा II1II
आणिक नये माझ्या मना I
हो का पंडित शहाणा II ध्रु II
नामरुपी जडलें चित्त I
त्याचा दास मी अंकित II2II
तुका म्हणे नवविध I
भक्ती जाणे तोचि शुद्ध II3II

अभंग क्रमांक 730

“माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई सेवा मानून घे आई” हे भगिनीवर्गाच्या ‘आई जगदंबे’ विषयी असलेल्या जिव्हाळायुक्त भक्तीच सुंदर प्रकटीकरण किंवा “हाके सरशी घाई घाई I वेगे धावत ती हो पायी I आली तापल्या उन्हात नाही आळस मनात I माझी रेणुका माऊली” हा जगदंबेचा पुन्हा आपल्या भक्ताविषयी जिव्हाळा असलेला अविष्कार. देव व भक्त उभय पक्षी असा जिव्हाळा जेव्हा पाहायला मिळतो तिथे आणखी काहीही मिळवायचं राहत नाही.

कारण सगळी तप, उपासना,साधना आपण वर्षानुवर्षे करतो ते आपले ध्येय गाठण्यासाठीच. ध्येय काय आहे? तर तुकोबाराय म्हणतात तसे “देव पहावया गेलो तेथे देवच होऊन ठेलो” पण आपल्या हे गावी नसते. आपण नुसते करत राहतो व ते यांत्रिक होत जाते. त्यात कोरडेपणा येतो. कुठेही भावनिक ओलावा आढळत नाही. येथे नाम घ्यायचे आहे सप्रेमाने, ध्यान करायचे मनापासून, सत्संग चुकवायचा नाही, सदग्रंथाचे वाचन करायचे ते समजून घेऊन करायचे.”विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे” दास व भक्त म्हणून घेत असू तर काही नियम पाळावेच लागतात. खूप अवघड असते त्यात काही नसते पण परनिंदा न करणे, चोरी न करणे, चहाडी न करणे, दुसऱ्याच्या सुखात सुख व दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणे, रंजलेले गांजलेले जीव असतात त्यांना मदत करणे, मुक्या जनावरांना प्रेम करणे, शेजारधर्म पाहणे असे छोटे छोटे अलिखित नियम आपण स्वतःहून अंगीकारणे या गोष्टी घडल्या तर भक्तीला अधिकच रंग चढतो व अर्थही प्राप्त होतो शेवटी एकाच सुंदर ओळीत आपण अनुभवतो “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” अशी साधी सरळ स्वभावाची मोकळे असलेली व वाणी रसाळ असलेली मंडळी संतांनाही खुप आवडते. जो हरिभक्तीसाठी तत्पर असतो अशी मंडळी तर त्याच्या गळ्यातले ताईत बनतात. त्यांचे ते सोयरे होतात सोबती होतात नव्हे त्या भक्तांचेही दास होतात.

विठोबाचे पाय जे निरंतर आठवतात त्यांना तुकाराम महाराज मानतात. सहसा व्यक्तीचा मान हा त्याला मिळालेले शिक्षण, पैसा ,लोकसंग्रह, चारित्र्य व एकूणच त्याला असलेली प्रतिष्ठा यावर अवलंबून असतो. ‘शहाणपणा’ असणे हा चांगलाच गुण आहे.प्रपंच करताना व परमार्थ साधतानाही शहाणपण लागते पण त्या शहाणपणाचा व पंडित त्याचा विशेष गौरव ते करत नाहीत कारण पंडित असेल तर ग्रंथाचे अर्थ काढताना त्यात नाना भेद दाखवून आपले पांण्डित्य तो दाखवेल पण खऱ्या सुखाला अंतरेल. नुसती चर्चा, संशय, दाखले याने काही भगवंत प्राप्ती होत नसते. चौकस बुद्धीपेक्षा सश्रद्ध मन इथ लागते. या भूतलावर आलेले धनाचे डोंगर म्हणजे धनवान व बुद्धीचे सागर असलेले सुशिक्षित सारेच मृत्युपंथी जातात. हे मान्य असावे लागत. यातून सुटतो कोण? “तरी येथ एकचि लीला तरले I जे सर्व भावे मज भजले” अशा सर्व भावानिशी भजन घडण्यासाठी निश्चयात्मक बुद्धी लागते. नाहीतर ‘भरला पुर मायेचा लोंढा ‘ असं नकळत घडून जाते म्हणून सावधपणे, दक्षपणे काही काळ बाजूला काढून हात जोडून देवासमोर बसावे लागते व म्हणावे लागते,”सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ति, रखुमाईचा पती सोयऱिया” हळूहळू चित्त त्याच्या चरणाशी जोडु लागते व गोड अनुभूती येऊ लागते. त्याचे रूप व नाम सुख देतातच पण सर्वकाळ त्याचीच आस लागुन राहते व नकळत उदय होतो तो नवाविधभक्तीचा. कोणीतरी सुचवितो अमुक ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रवचन चालतात. फार सुंदर असतात. एकदा येऊन पहा. आपण वेळ काढून जातो आवड असेल तर सवड मिळतेच व श्रवण ही पायरी आपण चढतो. मनःपूर्वक ऐकतो व धन्य होतो. “एक तरी ओवी अनुभवावी” असे आपल्याला वाटते. घरी येऊन आपण त्या निरूपणाचा विचार करतो. झोपताना का होई त्या सुंदर ओव्या आठवतात व मनन सुरू होते,”या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारती ” असे असतात याचे चिंतन सुरू होते .पूजा करताना तर जे जे अर्पण करू ते ते करता करता “पूजा होताती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा” आता तुझी पूजा कशी केशीराजा करावी अशी मनात शंका येते कारण पत्र, फुल, जल, दूध त्यानेच तर निर्माण केले. “मी देवाचा देव माझा सत्य हीच माझी वाचा” या न्यायाने खरं दास्तत्व घडते व प्रभू पायी तो जीव अनन्य होतो. सख्य भावाने गोपिका कृष्णमय झाल्या. ‘गोरस घ्या, गोरस घ्या’म्हणायचे विसरल्या व ‘श्रीहरी घ्या श्रीहरी घ्या’ असेच म्हणू लागल्या. उद्धवाला तर साक्षात कृष्ण दाता लाभला. संतांच्या वाड्मयाने किंवा त्यांच्या सहवासाने नामाची गोडी लागते व ‘अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण’ अशी जपमाला किंवा नामसंकीर्तन घडू लागते.अतिशय भाग्याने जर सद्गुरु लाभले तर विवेकान त्यांचा विशेष आदर केला जातो व त्यांच्या चरणी चित्त, काया, वाचा, मन, बुद्धी समर्पित केली जाते व पादसेवन घडते. जसे समर्थांनी ‘कल्याण छाटी’ म्हणतात दरीत उडी घेतली. इतके समर्पण करणारा कल्याणासारखा शिष्य विरळाच म्हणावा लागेल.आत्मनिवेदन म्हणजे पूर्णपुरुष. “आपणा आपणासि लाभ हे ज्ञान परम-दुर्लभ” जे आदि अंती एक स्वरूपच असते. असे संत महंत म्हणजे ज्ञानाचा सागरच. म्हणूनच जनाबाई म्हणते,”मरोनिया जावे बा तुझ्याच पोटी यावे.ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर”श्रीकृष्ण शरणं मम्…….

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.