जुन्या भांडणाच्या रागातून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न

अल्पवयीन चालकाने कार थेट अंगावर घातली

0

 

आळंदी, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पुण्यात पोर्श कार अपघाताचे प्रकरण अद्याप मावळत नसताना पुन्हा पुण्याजवळील आळंदीत एका अल्पवयीन मुलाने धक्कादायक प्रकार केला आहे. जुन्या भांडणाचा राग धरुन या अल्कापवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

व्हिडीओत दिसतोय थरार

आळंदी जवळ असलेल्या वडगाव घेणंद येथील हा अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. जुन्या भांडणाचा रागामुळे एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. हा अल्पवयीन कार चालक त्या महिलेस चिरडण्यासाठी आधी कार पाठीमागे (रिव्हर्स) घेऊन जातो. त्यानंतर भरधाव वेगाने चालवत काही नागरिकांना आणि त्या महिलेस चिरडण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणार आणि मनात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे.

 

 

अल्पवयीन मुलाने हा अपघाताचा थरार केल्यानंतर तो थांबला नाही. त्यानंतर तो कारच्या छतावर बसून शिवीगाळ करताना दिसत आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

अल्पवयीनांच्या अपघाती घटनांमध्ये वाढ

दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकावर अजून काहीच कारवाई झाली नाही. पुणे आणि परिसरात बड्या व्यक्तींच्या अल्पवयीन मुलाना गाड्या देणे नागरिकांच्या जीवावर उठले आहे. पोर्श प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुले अन् त्यांच्या पालकांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.