हाचि सुबोध गुरुचा

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा 179 वा जयंती उत्सव

0

लोकशाही विशेष लेख

‘‘थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या सम व्हावे हाचि सापडे मार्ग खरा….’‘
संत महंतांची चरित्रे, थोर युगपुरुषांच्या कथा, देशभक्तांचे व ज्येष्ठ समाजसेवकांची आत्मचरित्रे किंवा चरित्रगाथा आपण ऐकतो, वाचतो त्यातून आपल्यालाही एक प्रेरणा स्तोत्र गवसतो. असेही ध्येयवादी जीवन असते हे पाहून नकळत ऊर्जा मिळते. संतांच्या जयंती व पुण्यतिथी आपण साजरी करतो ते आपले जीवन संपन्न व्हावे व त्याचे उन्नयन व्हावे म्हणूनच. कारण संत वरवर पाहता देहधारी आपल्यासारखेच असतात. त्यांचा अंतरंग अधिकार आपल्या सारख्यांच्या कधीकधी लक्षात येत नाही.

संतांच्या नुसत्या स्मरणाने आपल्याला स्फूर्ती मिळते. भक्ती पंथावरून मार्गक्रमणा करावी किंवा काही पाऊल तरी त्या दिशेने पडावीत असे निश्चितच वाटते. साधनेला एक वेग लाभतो. एकूणच जीवनाला दिशा लाभते. असेच एक महान संत ज्यांची आपण आज ठिकठिकाणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने जयंती साजरी करीत आहोत.

‘‘जयांचा जन्म जगी नामार्थ झाला’‘
‘‘जयाने सदा वास नामात केला’‘
‘‘जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ती’‘
‘‘नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती’‘

यातच त्यांचे सारे चरित्र सामावलेले आहे ते थोर ब्रह्मचैतन्य मूर्ती गोंदवलेकर महाराज होत. अनेक जन्माचे पुण्य फळास येते म्हणून असे संत जन्माला येतात. त्यांच्या जीवनाला एक प्रयोजन असते त्या दृष्टीने ते साधना करतात. साधनेसाठी खडतर जीवन स्वीकारतात ‘हम बन चुके’ असा भाव त्यांचा कधीही नसतो.

‘‘अखंड खंडेना जीवन राम कृष्णहरीनारायण’‘ असे त्यांचे होऊन गेलेले असते.
‘‘कोण पाहे सुखा नाशिवंताकडे I तृष्णेचे बापुडे नव्हे आम्ही I’‘ कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीकडे त्यांची धाव नसते ध्येय एकच असते ‘‘एक धरला चित्ती I आम्ही रखुमाईचा पति’ ‘जनमानसाने निंदा केली तरीही ते त्यांचा प्रगल्भ विचारांचा पाठपुरावा आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष करतात. ब्रह्मचैतन्यमूर्ती गोंदवलेकर महाराज असेच एक महान साधु आहेत.

‘‘जो जनांमध्ये वागे I परिजना वेगळ्या गोष्टी सांगे I जयाचे अंतरी ज्ञान जागे I तोचि साधुI’‘

हे त्यांना सार्थपणे लागू पडते. ते अतीव प्रेमळ व अति उदार होते. भगवंताचे नाम त्यांनी प्राणाच्या पलीकडे जपले. नामासाठी नाम घ्या, प्रेमाने, भावाने व अंत:करणपूर्वक घ्या. एवढाच उपदेश ते संसारी जनांना करीत राहिले. कारण आपण संसारी माणसं परमार्थाकडे पाठ फिरवतो, वेळ नाही म्हणतो किंवा वय वर्ष साठी नंतर बघू असा युक्तिवाद करून स्वतःची समजूत काढतो. याकरता कलियुगात त्यांनी अतिशय सोपा मार्ग सांगितला, ’‘ नाम सदा बोलावे, भावे गावे, जनासी सांगावे हाच सुबोध गुरुचा नाम परत सत्य न मानावे’‘ असे त्यांनी निक्षून सांगितले संसार वाईट नाही तो टाकायचा नाही. उलट तो ‘‘दाताराम सुखाचा I संसार माना तू प्रभुसेवा I’‘ असा समजून करायचा कारण सुख दुःख मिश्रित संसारात संतोष टिकवणे फार अवघड असते.
यासाठीच राम हा आधार लागतो व रामावर विश्वास लागतो. राम आपलासा करण्यासाठी त्याचे नाम हेच सुलभ व सुंदर साधन आहे.
नामसंख्या व नाम माळा किती जपल्या त्यापेक्षा नामाच्या प्रेमात रंगून जाऊन देह बुद्धीचा थोडा विसर आपल्याला पडतो की नाही हे महत्त्वाचे असते व संतांच्या प्रत्यक्ष सहवासात हे नाम लवकर फलद्रूप होते. आजही गोंदवल्यात अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, उच्चपदस्थ अधिकारी, श्रीमंत -गरीब, ग्रामीण- शहरी, स्त्री-पुरुष, अबालवृद्ध, परदेशी मंडळी येतात व ‘‘श्रीराम जय राम जय जय राम’‘ असा नामोच्चार करत महाराजांच्या सेवेत कार्यरत असतात. चार पिढ्यांपासून सश्रद्धेने येणारे भक्त आजही आहेत.

‘‘जो जाई एक वार I तो विसरे घरदार‘‘
‘‘दासादासांचे माहेर I ऐसा नाही पाहिला‘‘

गोंदवल्यास आले की माहेरी आल्यासारखे वाटते कारण संतांचे ग्रंथ हे मार्गदर्शक खरे पण वाचून हे घडत नाही. संतांच्या सहवासात सहज घडत कारण आपला अहं विसर्जित होतो. देव काय, संत काय भक्तांचा स्वीकार गुण व अवगुणासह करितात.

‘‘आपणा सारिखे करिती तात्काळ I नाही काळ वेळ तया लागी ‘‘

आपले शिक्षण, व्यवसाय, नोकरी धंदा, एकूण संसारीक जबाबदाऱ्या उदंड प्रामाणिक प्रयत्न करून उज्वल भवितव्य संपादन करावे. पण हे ध्यानात असू द्यावे काळ पुढे पुढे सरकत राहतो. सकाळ संपते, दुपार होते, रात्रीचे अस्तित्व समोर येते. शिशिर संपतो व वसंत येतो. क्रीडा करता करता काल ही पुढे सरकतो पण माणसाच्या ‘आशा’ त्याला अंत नसतो. जीवनाविषयी सकारात्मक आशावाद निराळा व आशाच न संपणे ही आणखी एक वस्तूस्थिती आहे. म्हणूनच ब्रह्ममूर्ती एक नेमकी व परिणामकारक साधना सांगतात,

‘‘नका धरू काही आस नाम जपा श्वासोश्वास’‘

वरवर सोपा वाटणारा हा मार्ग त्यांनी सुचविला पण त्यातून जे साध्य गवसणार आहे ते अद्वितीय आहे. सप्रेमाने असे नामस्मरण करिता करिता तो अनंत, अफुट आनंदमय व चैतन्य स्वरूप असा आत्माराम आपल्याच ठिकाणी प्रकट होणार आहे. कुठेही हिमालय पर्वतावर जावे लागणार नाही व असाही सर्वसामान्यांसाठी एक अलिखित असा उपदेश ते करीत आहेत,

‘‘आचार संयमाने युक्त असा नितिधर्म पाळावा’‘
‘‘हाचि सुबोध गुरुचा प्रपंच खेळ असा मानावा’‘

पथ्य कोणते तर नितिधर्माने राहणे, आचार विचार एकूणच सारे व्यवहार एका संयमात व मर्यादेत गुंफलेले असावेत. मनाला ओंजारून गोंजारून पटवून द्यायचे की प्रपंच हा खेळ आहे कधी ऊन आहे कधी पाऊस आहे सारं इथं अनुभवयास येते कधी छातीची धडधड होते तर कधी इथं प्रगाढ शांतीचा अनुभवही येतो. आपल्या घरातच याचा अनुभव आपण घेतो हे सारे जमेस धरून आपण नित्य नामस्मरणाला सुरुवात करायची आहे.
आज महाराजांच्या 179 व्या जयंती प्रित्यर्थ आपण त्यांना एकनिष्ठ भावाने प्रनिपात करूया. ‘दासबोध’ या ग्रंथाचा काही अल्प भाग रोज वाचनात ठेवूया. नामात रंगून जाऊन देह बुद्धी थोडी का होईना कमी होते की नाही याच्या आत्मपरीक्षण करूया व या परममंगल दिनी ‘नामाचे प्रेम आम्हाला येऊ द्या’ असे मागणं त्यांच्या श्रीचरणाशी मागू या.

II श्रीराम समर्थ II

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.