कबिराचे विणतो शेले

0

लोकशाही विशेष

कबीरांचे स्मरण म्हणजे त्यांच्यातील ‘साधुत्व’, ‘धन्यता’, ‘पवित्रता’, ‘समानता’, ‘मानवता’ व ‘प्रभूशी एकरूपता’ याचे परिपूर्ण दर्शन. कबीरांच्या दोह्यातून सहज प्रकट झालेली काव्य प्रतिभा व त्याला असणारा परमतत्त्वाचा स्पर्श केवळ अंतकरणाला थेट भिडणारा आहे म्हणून तर “कल करे सो आज कर” अशी घोषवाक्य त्रिकाल बाधित सत्य वचन आहेत. त्यांच्या सहज सुंदर दोह्यातून जो गोफ विणला गेला आहे त्यातील एखादा जरी पदर आपण आत्मसात करू शकलो तर आपलाही जीवनपट अधिक समृद्ध व देखणा झाल्याशिवाय राहणार नाही व आजच्या या पवित्र दिनी ‘कौसल्येचा राम’ भेटण्याची पात्रता आमच्यात यावी ही नम्र प्रार्थना या महात्म्याच्या चरणी प्रकट करूया.

 

“आकाश पांघरोनी जग शांत झोपलेले”

“*घेऊनि एकतारी गातो कबीर दोहे”

प्रातःसमयी सुमधुर स्वरात सुमन कल्याणपुरकर यांचे हे गीत कानी पडते व डोळ्यासमोर कबीरजींची प्रतिमा हुबेहूब उभी राहते. गीत अंतर्मुख करायला लावते. ते केवळ सुश्राव्य राहत नाही तर त्याच्या पलिकडे जाऊन हृदयाशी स्थिरावते अन मनात विचार येतो या गीतातील ओळीत जणू कबीरांचे सर्व चरित्रच अनुस्युत आहे.

 

भगवद्गीतेत एक सुंदर वचन आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती निद्रिस्त स्थितीत असतात त्या ठिकाणी योगी व मुनी जागृत अवस्थेत असतात व जिथे महात्मे जागे असतात त्या ठिकाणी जनमानस झोपलेले असते.

 

पहा ना जग रहाटी अशीच आहे. बालपण खेळण्यात जाते. खेळकर मुलं इतके खेळतात ते खेळता खेळता झोपतात. विद्यार्थी विद्यार्जनासाठी अथक मेहनत घेतात. गृहस्थ धनसंचय गाठीशी हवा म्हणून अधिक कष्ट व मेहनत घेतात. गृहिणी संसारातल्या सर्व गोष्टी पार पडाव्यात म्हणून कष्ट घेते व जो तो दमून भागून किंबहुना उद्या पंधरा मिनिटं लवकर उठूया हा निश्चय करूनच झोपतो. यात आपल्याला काही वेगळे वाटणार नाही व वाटूही नाही इतके ते सहज आहे.

 

पण संतांचे, साधूंचे वेगळेपण असे असते की केवळ धनसंचय,मान- प्रतिष्ठा, विद्यासंचय,लौकिक यातच व्यस्त राहून मिळालेला नरदेह वाया घालवीत नाहीत. त्यांना जागृती असते त्यामुळे नामस्मरण, ध्यान, सदग्रंथांचे वाचन चिंतन मनन, सद्गुरु भेट, साधना याविषयी ते विशेष सतर्क असतात किंबहुना अधिक सावध असतात. संत कबीर अशापैकीच एक संत, महात्मे,साधुपुरुष होते.निरू व निमा नामक विणकर दाम्पत्याला ते तलावाकाठी सापडले. त्यांनी त्याचे नाव ‘कबीर’ असे ठेवले. उपजतच कबीरांना नामस्मरणाची व भजनाची खूप गोडी होती. ते शेळ्या चरायला न्यायचे, शेले विणायचे पण ते शाळेत गेले नव्हते.आपल्याला सद्गुरु भेटावेत अशी मात्र त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यानुसार तसेच घडले.

 

रामानंदस्वामी रोज पहाटे स्नानास जात त्या मार्गावर कबीर जाऊन पोहोचले अर्धवट अंधार- प्रकाशात रामानंदस्वामींचा पाय कबीर यांना लागला ते ‘श्रीराम श्रीराम’ असे म्हणाले त्याच क्षणी कबीरांनी तो गुरुमंत्र प्रसाद म्हणून स्वीकारला व रामनामाचा अखंड जप साधन म्हणून करीत असताना ते ध्येयप्रत पोहोचले. त्यांना ‘रामदर्शन’, ‘भगवंत भेट’ प्रत्यक्ष झाली. साधू म्हणजे ज्याला ते ‘परमतत्व’ साधलय, अनुभूती घेता आली आहे तो साधू. अशापैकी कबीर खऱ्या अर्थाने साधू बनले.

 

“मनवा मेरा मरो गयो” माझं मन राम राम भजन करता करता इतके एकरूप झाले की मनाचा व्याप, भय, संघर्ष मला स्पर्श करू शकले नाहीत. याही पुढे जाऊन ते म्हणतात,

“पीछे पीछे राम चलत हैं”

 “कहत कबीर कबीर” मागे पुढे प्रत्यक्ष रामच आहे हे त्यांच्या प्रचितीचे बोल ठरले. त्यांची सर्व कामे रामास अर्पण होती.

“हळुहळु उघडी डोळे, पाही जो कबीर”

“विणोनिया शेला गेला सखा रघुवीर”

असे सहज उद्गार बाहेर आले. त्यांचे दोहे पाहिले म्हणजे आश्चर्यचकित व्हायला होते नुसते शिक्षण घेऊन, ग्रंथाचा अभ्यास करून,वादविवाद करून व्यक्ती पंडित होईल पण ती साधू होणार नाही हे त्यांनी निक्षून सांगितले.प्रेमावर त्यांनी भर दिला. एकमेकांशी भांडू नका. समान तत्वाने रहा. राम व रहीम एकच आहेत. प्राणीमात्रांवर दया करा. भक्तीत प्रेम हवे. बाकी सारे थोतांड आहे.

“ढाई अक्षर प्रेम का पढे तो पंडित होई” असे साधे व सोपे तत्वज्ञान त्यांनी सांगितले.

कबीरांची काव्यप्रतिभा अलौकिक होती. त्यांच्या दोह्यातून हे अद्भुत सामर्थ्य जाणवते. या मायारूपी संसारात मानव प्राणी पतंगासारखा झेप घेतो व ज्याप्रमाणे फुलपाखरू जसे दिव्याच्या मोहाने ज्वालेत प्रवेश करते व नाश पावते. जिवित हे असे क्षणभंगुर व अशाश्वत आहे त्यामुळे गुरूकडून सत्यज्ञान ग्रहण केले तरच जीवन धन्य होते अन्यथा नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.

याही खेरीज दोह्यातून, दुःखात जशी भगवंताची आठवण येते तशी सुखात ही ठेव. जपमाळ नुसती फिरून उपयोगी नाही त्याच्याबरोबर मन फिरते ते स्थिर हवे. तीर्थयात्रा, मंदिरे, पूजापाठ यापेक्षा दया- धर्म-क्षमा हे गुण अधिक महत्त्वाचे आहेत. खाणे- पिणे – झोपणे यात हिऱ्यासारखे मौल्यवान आयुष्य क्षणोक्षणी जात आहे याचे भान फक्त असू द्यावे. म्हणूनच “कल करे सो आज कर” आताच तु भक्तीमार्गाकडे वळ. संत जसे आरशासारखे अंर्तबाह्य स्वच्छ व निर्मळ असतात तसेच बनायचा तु प्रयत्न कर.

“आखिर ये तन खाक मिलेगा काही की मग्रुरी रे” मग्रुरी तू करू नकोस, अहंकार, अहंगड ठेवू नकोस, दुर्बलांना त्रास देऊ नको त्याची ‘हाय’ लागते. दोह्यातून त्यांनी केलेला उपदेश वर वर सोपा वाटतो पण आचरणास अवघड असाच आहे. पवित्र आचरण व उपासना किंवा साधना हातात हात घालून मिळून चालायला हव्यात तरच ‘इप्सित’ साध्य होईल.

या साधनेचा फलित काय? तर कबीर जी म्हणतात, “कहत कबीरा,सुनो भाई साधो, साहब मिलेगा सबुरीमें” ‘साहब’ अर्थात परमेश्वर, कर्ता-करविता, जगन्नियता. साहब हा अतिशय चपखल शब्द आहे. वरिष्ठांचा वरिष्ठ नोकरीत आपल्याला वरिष्ठांशी नेहमी संबंध असतो व त्यांना खुश ठेवण्यासाठी जो आटापिटा पण करतो तोही आपल्या परिचयाचा आहे.

‘सुनो भाई साधो’ ते प्रेमाने, आपुलकीने, आत्मीयतेने आपल्याला ‘भाई’ संबोधतात. ‘अज्ञानी जीव’ अशा अर्थाने ते बोलत नाहीत. त्यांच्या दृष्टीने या ‘भाईत’ भगवंत भेटीला हवी असणारी पात्रता निश्चित आहे.फक्त सबुरीत काम केले पाहिजे. प्रेमाने दीर्घकाळ नाम घेतले पाहिजे.मनाला ‘सज्जन, साधू’बनविले पाहिजे. आपल्या ठायी विश्वास व श्रद्धा दोन्ही हवे आहेत. तसाच सर्वात मोठा गुण म्हणजे धीर धरायला हवा. तुमच्या अहंकाराला श्रीराम चरणी तिलोदक दिले पाहिजे. तरच हा ‘साहब’ निश्चित भेटणार.

जसा योग्य ऋतू येताच फळांना-फुलांना बहर येतो त्याच्याआधी येत नाही. तसेच योग्य वेळ येताच भगवंत दर्शन देईल. कारण तो ‘सर्वज्ञ’ आहे,सर्व जाणणारा आहे. त्यासाठी महाआरती करण्याची किंवा उंच स्वरात बांग देण्याची आवश्यकता नाही. अगदी छोटीशी मुंगी पण तिच्या पायात बांधलेले घुंगरू सुद्धा तो ऐकू शकतो. एकूणच तो भावाचा भुकेला आहे.

तो सर्वज्ञ असल्याने डोळसपणे आपण भक्ती करायला हवी.मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे त्याचे भान ठेवून भक्ती करायला हवी. कबीरजींच्या या व्यापक परमतत्वाला मनोभावे वंदन करूया व त्यांच्या साधुतत्त्वाला महात्म्याला त्रिवार साष्टांग नमस्कार करूया.

 

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे 

             कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.