काय आहे जुलै महिन्यात पावसाचा अंदाज..?

काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा : काय सांगितले हवामान विभागाने?

0

 

मुंबई

 

यंदाच्या मान्सूनमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जून महिन्यात देशात सरासरी 165.3 मिमी पाऊस पडतो. परंतु यंदा 147.2 पावसाची नोंद झाली. जून महिन्यात 2001 नंतर हा सर्वात कमी पाऊस झाला आहे. राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी अजूनही मोजकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. धरण क्षेत्रात जर पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या उद्भवू शकते. एकीकडे पाऊस कमी असल्याने तापमान देखील कमी झालेले नाही. त्यातच भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सोमवारी दिलासादायक बातमी दिली.

केरळमध्ये वेळेपूर्वी 30 मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्राकडे त्याची दमदार वाटचाल सुरु झाली. परंतु कोकणात आल्यानंतर मान्सूनने मोठाच विराम घेतला. आता जूनमध्ये रुसलेला मान्सून जुलै महिन्यात दमदार बसरणार आहे. असा अंदांज हवामान विभागाने वर्तविला आहे. सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात जुलै महिन्यात 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यांनी सांगितले की, जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै महिना पावसाचा  जोर चांगला असणार आहे. या महिन्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. देशात जुलै महिन्यात 280.4 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापेक्षा जास्त पाऊस यंदा होणार आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टीलगत कमाल तापमान वाढणार आहे.

 

हवामान खात्याने म्हटले आहे की, पश्चिम किनारा वगळता, वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी असेल. मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. अहवालानुसार, जुलै महिन्यात देशातील अनेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमचे काही भाग, मध्य भारताच्या लगतचे भाग आणि दक्षिण-पूर्व द्वीपकल्पातील काही भागात तो कमी असेल. आयएमडीने सांगितले की, जुलैमध्ये मान्सूनचा चांगला पाऊस अपेक्षित आहे. साधारणपणे ढगाळ आकाशामुळे किमान तापमान जास्त असल्याचे दिसून येतेय.’ उत्तर-पश्चिम भारतात गेल्या महिन्यात जूनमध्ये सरासरी 31.73 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे 1901 नंतरचे सर्वात उष्ण तापमान होते.

मान्सूनवर आता ला-निनोचा प्रभाव दिसणार आहे. प्रशांत महासागरात ला-निनोला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे. हिंद महासागरात मान्सूनला अनुकूलबदल दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात मंगळवारी ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच लोणावळ्यात मागील 24 तासांत 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांतील हा विक्रमी पाऊस आहे. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्यात वळू लागली आहेत. अश्यात एका मोठ्या दुर्घटनेने मात्र सर्वांना हादरवून सोडले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.