पोलीस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे पोलिसाकडून लैंगिक शोषण

0

नालासोपारा : – पोलीस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे एका पोलिसानेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपऱ्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली असून, त्यात एका महिला पोलीस सहकाऱ्याच्या कृतीला या महिलेने साथ दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. रक्षकच जर भक्षक बनले, तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नालासोपारा येथील पोलिसाचाही समावेश आहे. एका भरती प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली अटक करण्यात आलेले समाधान गावडे (२८) व त्याची सहकारी अनुजा शिंगाडे (२५) हे वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गावडे याने नालासोपारा येथे ‘विजयी भव’ पोलीस नावाची पोलीस अॅकॅडमी सुरू केली होती.

त्या क्लासमध्ये येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप गावडे याच्यावर आहे. या प्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत समाधान गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करत होता. शिकवण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरीराला हेतुपुरस्सर चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत होता, असे म्हटले आहे. समाधान गावडे अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा. तसेच त्यांना फिरायलाही बोलवायचा, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार असह्य झाल्याने या मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केले. गावडेची मैत्रीण अनुजा हिने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा मानसिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला आणि बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी पोलीस समाधान गावडे आणि त्याची सहकारी असलेली पोलीस अनुजा शिंगाडे या दोघांविरोधात विनयभंगाचे कलम ३४५, ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पॉक्सो) कलम ८, १२, १७ तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियमाच्या कलम ६६ सी आणि ६७ ए अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने त्यासंदर्भात जास्त माहिती देण्यात येणे शक्य नाही. या प्रकरणात आणखीही काही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.