पोलिसांच्या ‘सेटिंग सुट्ट्यां’ना बसणार चाप !

सशस्त्र विभागाच्या कर्मचाऱ्यांची आता नियमित यादी

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

सुमारे दहा हजार कर्मचारी संख्या असलेल्या मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी सेटिंग करून ठराविक पोलिसांना सुट्ट्या देत असल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली होती. वरिष्ठाची ‘आर्थिक मर्जी’ राखत हा सर्व कारभार सुरू असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला होता. मात्र आता या ‘सेटिंग सुट्ट्यां’ना चाप बसणार आहे. या सुट्ट्या आणि सुट्ट्यांवर जाणाऱ्या कमर्चाऱ्यांची माहिती दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पोलिसांच्या पत्रकात दिली जात आहे. त्यामुळे विभागापुरत्याच मर्यादित असलेल्या सुट्ट्यांचा विषय संपूर्ण पोलिस दलात जाहीर होत असल्याने अळीमिळी गुपचिळीला आळा बसणार आहे.

 

सेटिंग सुट्ट्यांची पोस्ट व्हायरल

मुंबई पोलिस दलाचा अविभाज्य भाग असलेल्या सशस्त्र विभागात नायगाव, ताडदेव, वरळी आणि मरोळ ही चार मुख्यालये असून या चारही मुख्यालयांना प्रत्येकी एक उपायुक्त आहेत. या उपायुक्तांच्या देखरेखीखाली या विभागाचे काम चालते. या विभागातील पोलिसांचा बंदोबस्त, गार्ड ड्युटीसाठी वापर केला जातो. या पोलिसांना नेमणूक देण्यासाठी त्यांच्यातूनच चारही मुख्यालयांत सुमारे 40 ‘कंपनी कारकून’ आणि ‘एनसीओ’ची निवड केली जाते. या पदावर निवड होण्यासाठी अंमलदार आपल्या वरिष्ठांना प्रत्येकी एक लाख रुपये देतात आणि त्याची भरपाई कर्मचाऱ्यांकडून वसुलीने केली जाते, असा दावा मार्च महिन्यात व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

30 टक्के पोलिस कायम सुट्टीवर

पोलिस दलामध्ये मनुष्यबळाची कमतरता असतानाच या विभागातील सुमारे 30 टक्के पोलिस कायम सुट्टीवर असतात, असा दावा करताना सुट्ट्यांची सेंटिंग बंद करण्यासाठी काय करावे, लागेल याबाबतची माहितीही पोस्टमध्ये देण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत विभागापुरत्या मर्यादित असलेल्या सुट्ट्या संपूर्ण पोलिस दलात जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकामध्ये सुट्टीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी, सुट्टीचा कालावधी, सुट्टीचे कारण याचा तपशील देण्यात येत आहे. सुट्ट्यांवर जाणाऱ्यांची माहिती उघड झाल्याने कोण किती आणि कधी सुट्टीवर जातोय, याची माहिती सर्वांना मिळत आहे. पोलिस पत्रकामध्ये सुट्ट्यांबाबतची माहिती येत असल्याने चिरीमिरी घेऊन दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या बंद होतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.