पाचोरा मतदारसंघात किशोर आप्पांसाठी वाट बिकट..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर मध्ये होऊन नोव्हेंबर मध्ये नवे सरकार सत्तेवर येईल. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका घोषित होतील. जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा जागांपैकी काल आपण अमळनेर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती बाबत ऊहापोह केला. जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघात अटीतटीची लढाई होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होईल असे बोलले जात असले, तरी त्यांच्या जागा वाटपावरून युतीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीत महायुती होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. विधानसभेतील आमदारांच्या बलबलवरून ११ विधान परिषदेच्या जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. परंतु ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे १२ व्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होईल? यावरून चित्र स्पष्ट होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यसभा विधान परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. यंदाच्या निवडणुकीनंतर तसेच काहीसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो… पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ २००९ साली २ हजार १८४ मताधिक्य घेऊन विजयी झालेले एकसंघ शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विरोधात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना १२०० मते जास्तीची मिळाली असती, तर अमोल शिंदे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असते. गेल्या पाच वर्षापासून पराभूत अमोल शिंदे पाचोरा तालुका भाजपचे अध्यक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे अमोल शिंदे यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान राहणार आहे.

२००९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार दिलीप वाघ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महाविकास आघाडीची युती होणार असून शिवसेनेला पाचोर्‍याची जागा दिली जाणार, हे आधीच ठरले आहे. माजी आमदार कै. आर. ओ. तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापासून वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव तालुका पिंजून काढला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशींनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी केलेला प्रचार लक्षवेधी ठरला आहे. करण पवार हे नवखे उमेदवार ऐनवेळी जळगाव मतदारसंघातून शिवसेनेतर्फे घोषित केले असताना सुद्धा पाचोरा भडगाव मतदार संघातून अवघ्या १६ हजार मताधिक्याची लीड भाजपच्या स्मिता वाघ यांना मिळाली, हे विशेष होय. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाला नाही तर राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार दिलीप वाघ हे चौथे उमेदवार असू शकतात. त्यामुळे पाचोरा भडगाव आमदार मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण मतदार संघात ०३ लाख १८ हजार मतदानाची चार जणांमध्ये विभागणी होईल यात शंका नाही. काँग्रेस सुद्धा महाविकास आघाडीची युती होणार नाही, हे गृहीत धरून स्वतंत्रपणे उमेदवार देऊन निवडणूक लढण्याचा विचार करीत आहे. तथापि आपण या मतदारसंघात कमजोर नाही हे दाखवण्या पलीकडे काँग्रेसचे अस्तित्व नाही, एवढे मात्र निश्चित..

पाचोरा भडगाव मतदार संघात तिरंगी अथवा चौरंगी लढत झाली तरी विद्यमान मतदार आमदार किशोर आप्पा पाटील यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. तिरंगी सामन्यात २०१९ साली ७१ हजार इतकी मते घेऊन अवघ्या २ हजार १८४ मताधिक्यांनी विजयी होणारे आमदार किशोर आप्पा पाटील यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फार मोठे आव्हान ठरणार आहे. त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांचे एकसंघ शिवसेना असताना तसेच त्यावेळी शिवसेनेची भाजपची युती असताना किशोर आप्पांना ७१ हजार इतकी मते मिळाली. आता शिवसेना दुभंगली आहे. मूळ शिवसेनेबरोबर गद्दारी करून शिंदे शिवसेनेत गेलेले आमदार संघातील शिवसेनेला पटलेले नाही. आपले वारसदार कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या विचारांशी त्यांनी प्रतारणा केली. यामुळे किशोर आप्पांबरोबर उभे ठाकलेल्या वैशाली सूर्यवंशी यांची पाटी कोरी आहे. निर्मल सीड सारख्या उद्योगाची धुरा त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था चालवून मतदारसंघातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडून दिली आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांचा मतदार संघातील संघर्ष पाहता वैशाली सूर्यवंशी यांना मतदार संघात लोकप्रियता मिळतेय. त्यामुळे आमदार किशोर आप्पांना वैशाली सूर्यवंशी यांचा फार मोठा अडसर राहणार आहे.

तिसरे उमेदवार भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी भाजपतर्फेच छुप्प्याने बंडखोरी केली होती. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा शिंदेंना आतून पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अपक्ष असून सुद्धा अमोल शिंदे यांनी फार मोठी बाजी मारली होती. आमदार किशोर आप्पांच्या दोन टर्म आमदारकीच्या कालावधीत अँटी इन्कम्बन्सी त्यांना भोवणार यात शंका नाही. त्यामुळे कदाचित या ठिकाणी अमोल शिंदे विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असा सामना झाला तर नवल नाही. एकंदरीत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या टर्मसाठीची उमेदवारी आमदार किशोर आप्पांना बिकट ठरणार एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.