अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

0

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने १८ ऑक्टोंबर रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन जिल्हयांसाठी जिल्हास्तरीय आणि २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठ प्रशाळांसाठी होणाऱ्या अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून १२ ऑक्टोबर ही अंतीम मुदत देण्यात आली आहे.

१८ ऑक्टोबर रोजी तीन ठिकाणी अविष्कार संशोधन स्पर्धा होणार आहे. जळगाव जिल्ह्याची स्पर्धा बी.पी. कला, एसएनए विज्ञान व केकेसी वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव, धुळे जिल्ह्याची स्पर्धा आर.सी. पटेल इन्स्ट‍िटयूट ऑफ फार्मास्युटीकल अॅण्ड रिसर्च, शिरपूर येथे आणि नंदुरबार जिल्ह्याची स्पर्धा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा येथे होणार आहे. तर विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा विद्यापीठात २० ऑक्टोबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील या स्पर्धा झाल्यानंतर विद्यापीठ पातळीवरील अविष्कार संशोधन स्पर्धा १२ व १३ डिसेंबर रोजी विद्यापीठात होईल.

या स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात मानव्यविद्या, भाषा व ललित कला, दुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषि आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समोवश आहे. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, आणि पदव्युत्तरपदवी या तीन संवर्गात होणार आहे. पोस्टर, मोड्युलद्वारे विद्यार्थ्यांना आपला संशोधनाचा अविष्कार मराठी, हिंदी अथवा इंग्रजी या भाषेत सादर करता येईल. प्रवेशिका शुल्क २०० रूपये ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी १२ ऑक्टोबर ही अंतीम मुदत राहील. यावर्षी पासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन (मेंटार) यांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. विभा पाटील, धुळे जिल्ह्यासाठी डॉ. शैलेश चालिकवार आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी डॉ. सुनिला पाटील आणि विद्यापीठ प्रशाळेसाठी डॉ.व्ही.एम. रोकडे हे काम पाहत आहेत. संपुर्ण स्पर्धेचे समन्वयक प्रा.जयदीप साळी व उपसमन्वयक प्रा. जितेंद्र नारखेडे आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेबाबत विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.