कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त पुरस्कार वितरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव दि. ११ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गेल्या ३३ वर्षाच्या वाटचालीत आपले वेगळेपण कायम ठेवलेले असून भविष्यात विद्यापीठाचे नाव अधिक उज्वल करण्यासाठी संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यावर मोठी जबाबदारी असून प्रत्येक घटकाने ती समर्थपणे पार पाडावी असे आवाहन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.आर.एस.माळी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार चोपडा तालुक्यातील पंचक येथील प्रगतीशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना दि. ११ ऑगस्ट रोजी देण्यात आला. रूपये ५१ हजार, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळयात प्रा. माळी बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी होते. जैन उद्योगसमुहाचे अध्यक्ष व विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे यांची उपस्थिती होती. याच समारंभात सन २०२१-२२ या वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक तसेच उत्कृष्ट मूल्यांकन प्रकल्प राबविणारे महाविद्यालये व समन्वयक यांना पुरस्कार देण्यात आले.

विद्यापीठाच्या अधिसभा गृहात झालेल्या या समारंभात प्रा. माळी म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार एका शेतकऱ्याला देवून विद्यापीठाने मोठा सन्मान केला आहे. भविष्यात कौशल्य विकसनासाठी शेतीच्या शिक्षणावर देखील भर दिला गेला पाहिजे. विद्यापीठाची ओळख संशोधनातून निर्माण होत असते. त्यामुळे संशोधन अधिक जोमाने करायला हवे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येवून पडली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा हातभार गरजेचा आहे. या विद्यापीठाने संशोधन, माजी विद्यार्थी या संदर्भातील सर्व डेटा अद्दयावत करावा. ज्यामुळे राष्ट्रीय श्रेणीत विद्यापीठ येईल असे ते म्हणाले. या पुरस्कारामुळे केलेल्या कामाचे कौतुक आणि भविष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देतांना हेमचंद्र पाटील म्हणाले की, माझ्या सारख्या शेतकऱ्याला विद्यापीठाने हा पुरस्कार देवून जो सन्मान केला आहे. त्यामुळे मी भारावलो आहे. बहिणाबाई यांच्या नावे हा पुरस्कार असल्यामुळे मला प्रेरणा देणारा आहे. तरूण पिढीच्या दृष्टीने शेती ही दुर्लक्षित झाली आहे. तंत्रज्ञानाची सांगड घालून जिद्द व मेहनतीने शेती केली तर शेतीतही करीअर घडू शकते आणि पैसा व मानसन्मान मिळू शकतो असे ते म्हणाले. वडील शिक्षक होते. मी कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वडीलांनी काळा कोट घालण्यापेक्षा काळ्या आईची सेवा कर असे सांगितले तेव्हा वडीलांकडून प्रेरणा घेवून मी शेतीकडे वळालो आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून समृध्द शेतीचे स्वप्न पूर्ण केले असेही पाटील म्हणाले.

अशोक जैन आपल्या भाषणात म्हणाले की, जळगाव ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या विद्यापीठाशी माझे भावनिक नाते आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदाचा जो सन्मान मिळाला आहे. त्याद्वारे विद्यापीठाला भरभराटीकडे नेण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने केला जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठ नामविस्तार व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतांना या विद्यापीठाची गुणवत्ता वाढत असून शैक्षणिक विकासासाठी जे – जे उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ प्रशाळांमध्ये चार नवीन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये इंग्रजी सोबत मराठीत शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे असे सांगितले. हेमचंद्र पाटील यांचे कृषी क्षेत्रातील काम बहिणाबाई चौधरी यांच्या श्रमसंस्कृतीशी नाते सांगणारे आहे. त्यांचा आदर्श तरूण पिढीने घ्यावा असे आवाहन कुलगुरूंनी केले.

प्रारंभी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. प्रा. वीणा महाजन व प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंचावर सल्लागार परिषदेचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, अनिल डोंगरे, प्रा.एस.टी. भुकन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. संतोष चव्हाण, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, प्राचार्य एस.एस. राजपूत हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.