निवडणुकीनंतरच ‘लाडक्या बहिणी’ला मिळणार ‘लक्ष्मी’!

जय-पराजयावर भवितव्य अवलंबून : सत्ताधारी श्रेय घेण्याच्या तयारीत

0

लोकशाही विशेष (दीपक कुळकर्णी)

राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ ही महिलांसाठी लाभदायी ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली असली तरी ही योजना प्रत्यक्षात विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच आकाराला येणार आहे. सुरुवातीला 15 जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट पर्यंत केली असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही योजना अंमलात येणार असून निवडणुकीनंतरच ‘लाडक्या बहिणी’ला खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मी’ प्राप्त होणार आहे.

मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज चौव्हाण यांनी ‘लाडली बहण’ नावाची योजना अमंलात आणल्यानंतर पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार यश मिळाले होते. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना राबवून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आखण्यात आली असे महायुतीचे नेते सांगत असले तरी त्यात ‘जुनावी जुमला’ आहे हे तेवढेच सत्य! मध्यप्रदेशात भाजपाचे सरकार येणार नाही अशा चर्चेला उधाण आले होते, त्यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्री शिवराज चौव्हाण यांनी ‘लाडली बहण’ योजनेचे बारसे घातले आणि महिलांना प्रतिमहिना आर्थिक लाभ देण्यात आला. याचाच लाभ भाजपाला निवडणुकीत झाला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महायुतीच्या नेत्यांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या कृप्त्या लढवाव्या लागत असून त्याचाच एक भाग म्हणून या योजनेचा जन्म होवू घातला आहे. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर ही योजना प्रत्यक्षात साकार होणार आहे.

जय-पराजयावर भवितव्य अवलंबून
महायुती सरकारने मोठा गाजावाजा करुन ही योजना राबविण्याची सुरुवात केली असून राज्यभरात अर्ज भरण्यासाठी महिलांची लगबग सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी महिलांची लूट देखील होत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपासह मित्रपक्षाला यश मिळाले तर ही योजना प्रत्यक्षात साकार होणार आहे. विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर तोंडसुख घेतले असून ते या योजनेच्या विरोधात आहेत.

श्रेय घेण्यासाठी चढाओढ
राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. मुळात भाजप सरकार असलेल्या प्रदेशात ही योजना राबविण्यावर भर दिला जात असून राज्यात भाजप पदाधिकारी या योजनेचे श्रेय घेण्यात पुढे आहे. आमच्या पक्षाच्या अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याने राष्ट्रवादी तर मुख्यमंत्रीपद असलेली शिवसेनाही या योजनेचे श्रेय घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.