‘त्या’ नराधमाला आमच्या ताब्यात द्या..! : जमावाचे हिंसक स्वरूप

पोलीस स्टेशनची दगडफेक करून तोडफोड : अधिकाऱ्यासह १० पोलीस जखमी

0

 

जामनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा चिंचखेडा बु. गावात दि ११ जानेवारी रोजी सहा वर्षीय बालिकेवर अत्याचर करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष इमाजी भिल (35), रा. चिंचखेडा ता. जामनेर या फरार आरोपीला भुसावळ येथून तापी नदीजवळ काल २० जून रोजी अटक करण्यात आली.

दरम्यान नराधम आरोपीला अटक केल्याची माहिती मिळताच जमावाने रात्री उशिरा मोठ्या संख्येने एकत्र येत पोलिस ठाण्यावर हल्ला केला आणि आरोपीना जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी सुरू केली. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत जामनेर पोलिस ठाण्याची तोडफोडही केली. यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलिस जखमी झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून करणारा आरोपी सुभाष इमाजी भिल (35), रा. चिंचखेडा ता. जामनेर या फरार आरोपीला भूसावळातून अटक करण्यात आली. दरम्यान हे वृत्त पसरताच जामनेर शहरात नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव पोलिस ठाण्यात घुसला आणि आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली.

 

पोलिसांवर दगडफेक : निरीक्षक जखमी

आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत लोकांनी रास्ता रोको करून चक्क पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांनी जमावाची मागणी मान्य न केल्याने संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. जमावाने दगडफेक करून  पोलीस ठाण्याची तोडफोड केली. यानंतर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. काही नागरिकही जखमी झाले.


दंगल नियंत्रण पथक, पोलिस अधीक्षक दाखल

दरम्यान रात्री अकराच्या सुमारास पोलीस अधीक्षक आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर दंगल नियंत्रण पथके जामनेर शहरात रवाना करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे स्वतः जामनेरात दाखल झाले होते.

 

काल होता गुरुवारचा आठवडे बजार

दरम्यान जामनेरचा मुख्य आठवडे बाजार होता. सध्या कैऱ्यांचा सिझन चालू असल्याने पंचक्रोशीतून अनेक नागरिक कैरी खरेदीसाठी बाजारात आले होते. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये सदर घटना घडली आहे. यदा कदाचित घटना सांयकाळी बाजाराच्या वेळी घडली असती तर याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला असता. परिणामी अधिक गदारोळ मारण्याची शक्यता होती.

 

पोलीस स्टेशन समोरच शाळा

दगडफेकीची घटना घडली त्या पोलीस स्टेशन समोरच न्यू इंग्लिश स्कूल ही नावाजलेली शाळा देखील आहे. अगदी रस्ता ओलांडून असलेल्या या शाळेवर या घटनेचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पाथदिवेही बंद

दगडफेकीची घटना घडली तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले. परिसरातील तसेच पोलीस ठाण्यासमोरील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर देखील अंधार होता. दुभाजकांचे काम चालू असल्यान पथदिवे बंद होते. याचा फायदा जमावाला झाल्याने अचानक झालेली तुफान दगडफेक हाताबाहेर गेली.

 

हे अधिकारी कर्मचारी झाले जखमी

या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापैकी रामदास कुंभार, रमेश कुमावत गंभीर जखमी आहेत. तसेच जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.