जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
१८ वर्षीय तरुणाने शेतातच झाडाला गळफास घेतल्याचे घटना शुक्रवार, १४ जून रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. अलोक रवींद्र घुले (१८, रा. देव्हारी, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलोक इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाल्याने अलोक हा शेतीकाम संभाळत होता. त्याला एक लहान भाऊ आहे.
देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात जाऊन त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व आंघोळ करून पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर शेजारील शेतातील लोकांना अलोक हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला.
दरम्यान त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. अलोकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.