मनपा आयुक्त ढेरेंना जळगावची आव्हाने पेलतील का?

0

लोकशाही संपादकीय लेख (भाग- २)

 

जळगाव शहरातले रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी, शहरातील स्वच्छता, शहरातील वाढीव वस्त्यांमधील नागरी समस्या सोडवण्याबरोबरच गतिमान आणि पारदर्शक प्रशासन राबविणे ही आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या समोरील आव्हानांबाबत कालच्या अग्रलेखात विचार मंथन केले. आज आपण नव्या विषयाला हात घालू. जळगाव शहरातील वाढते अतिक्रमण ही शहरासाठी डोकेदुखी बनली आहे. शहरातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. शहरातील ज्या ज्या भागात ‘नो अतिक्रमण झोन’ जाहीर करण्यात आलेला आहे, तो भाग उलट अतिक्रमणाने व्यापलेला आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या फुले मार्केटमध्ये तर नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल होते. सकाळी १२ वाजेपर्यंत मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी ट्रॅक्टर घेऊन उभे असतात, तोपर्यंत मार्केटमध्ये एकही अतिक्रमण नसते. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच मार्केटमधील रिकामा भाग क्षणात अतिक्रमणाने व्यापला जातो. त्यानंतर दिवसभर रात्रीपर्यंत अतिक्रमणवाल्यांची पूर्णपणे चलती असते. असा प्रकार शहरातील सर्वच भागात असतो, असे म्हटले तर त्यात काहीही चुकीचे नाही. त्यावर वेगळा तोडगा किंवा उपाय करण्याची गरज आहे. पण तसे होत नाही. यावरून हे स्पष्ट होते की, अतिक्रमण विभाग आणि अतिक्रमण धारक यांच्यात साठे लोटे आहे.

अतिक्रमण धारकांकडून अतिक्रमण विभागाला ‘चिरीमिरी’ मिळत असावी, असे स्पष्ट बोलले जाते. त्यामुळे अतिक्रमण धारकांची नागरिकांबरोबर अरेरावीची वागणूक असते. त्यांची मुजोरीही वाढलेली असते. त्यामुळे ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ अशा प्रकारचा खेळ अतिक्रमणधारक आणि मनपा अतिक्रमण विभाग यांच्यात चालू असतो. त्यामुळे अतिक्रमण धारकांचे फावते आणि मोकळे रस्ते अतिक्रमण धारकांनी व्यापून टाकले जातात. त्यासाठी नवे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण धारकांवर योग्य ती कारवाई केली तर अतिक्रमणे कमी होतील. अन्यथा अतिक्रमणे कमी होणार नाहीत. जळगाव मनपा हद्दीत येऊन भुसावळ रोडवरील खेडीला २५ वर्षापेक्षा जास्त झाले. खेडीचा मुख्य रस्ता डीपी रोडवर रस्त्याच्या मध्यभागी अतिक्रमण करण्यात आले आहे. या डीपी रोडला बांधकाम विभागाची मंजुरी मिळाली, परंतु गेले वर्षभर हा रस्ता केवळ रस्त्याच्या मध्यभागी अतिक्रमण असल्याने बांधकाम विभागाकडून तयार केला जात नाहीये. मनपाचे बांधकाम विभाग म्हणते सदरचे अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ता कामाला सुरुवात करता येणार नाही. अतिक्रमण विभाग म्हणते नगर रचना विभागाने रस्त्याची आखणी करून द्यावी, अशा प्रकारे बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाकडून एकमेकांवर टोलवाटोलवी केली जात असल्याने डीपी रोडचे काम वर्षभरापासून होत नाहीये.

प्रशासनाचा हा अजब प्रकार म्हणता येईल. यात नागरिक रखडले जात आहेत. वर्षभरापासून हा रस्ता प्रलंबित आहे. रस्ता होत नसल्याने गटारी होत नाही, गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या परिसरात आरोग्याला धोका निर्माण होत होतो, हे सांगण्याची कुणाला ज्योतिषाची गरज नाही. असे प्रकार आयुक्त ढेरे साहेब कसे हाताळत किंवा त्यातून मार्ग कसा काढतात हा खरा प्रश्न आहे. हे एका खेडीतील उदाहरण झाले. शहराच्या अनेक भागात अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतय.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गामुळे अपघातांची संख्या वाढली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी पुढे झाली. त्यासाठी जळगावकरांनी आंदोलन केले, तेव्हा कुठे खोटे नगर ते कालिंका माता चौकापर्यंत आठ किलोमीटरचे चौपदरीकरण झाले. तीन ठिकाणी अंडरपास काढला काढण्यात आला. बाकी तीन ठिकाणी चौकात रोटरी सर्कल केले. एवढे करूनही अपघाताची मालिका थांबता थांबेना. थांबेल कसे, महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत समांतर रस्ते दोन्ही बाजूने झाले असते तर शहरातील वाहतूक सुरळीत होऊ शकली असती. हे समांतर रस्ते करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना ते केले जात नाही. असे एकमेव मुख्य कारण म्हणजे महामार्गाच्या समांतर दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमानामुळे समांतर रस्ते करण्यासाठी जागाच नाही. महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु महापालिकेतर्फे ही अतिक्रमणे काढली जात नाही. ‘ती काढली जात नाहीत’ हा एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. परंतु सदरची अतिक्रमणे हटवण्यास महापालिका हतबल का आहे? कळत नाही, पाणी कुठे मुरते आहे? याचा अभ्यास करून नवे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमणे हटवली तर समांतर रस्त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

समांतर रस्ते झाल्याशिवाय अपघाताची मालिका थांबणार नाही. महामार्गाचे बायपास शहरा बाहेरून करण्यात आले आहेत. परंतु अजून दोन वर्ष बायपासचे काम पूर्ण होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शहरातील अपघातात किड्या मुंग्यांसारखे माणसे मरत असताना आणखी किती वाट पाहणार? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी महामार्ग लगतची अतिक्रमणे काढून समांतर रस्ते तातडीने केले पाहिजे. नवे आयुक्त याची दखल घेतील का…?

 

क्रमशः..

Leave A Reply

Your email address will not be published.