पुन्हा एक महत्वाची परीक्षा रद्द : विद्यार्थी संभ्रमात

तांत्रिक बिघाड झाल्याने केली रद्द : परीक्षा आजच घ्या : विद्यार्थी संतप्त

0

 

मुंबई,

 

परीक्षा रद्द होऊन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नीट परीक्षेचे रद्द होणे ताजे असतांना पुन्हा एकदा मोठी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणारी महत्वाची परीक्षा आज पुन्हा रद्द करण्यात आली. लिपिक टंकलेखक पदासाठी होणाऱ्या कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ही परीक्षा टीसीएस  कडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

 

एमपीएससी मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा पवईत होणार होती. मात्र 1 जुलैला सकाळच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. लिपिक टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षेच्या पहिल्या सत्राचा वेळ हा 9 ते 10 या काळात होता. मात्र 12 वाजले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडण्यात आले नाही. तर दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा 11:30 ते 12:30 वेळेत होती, त्यांना अजून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आलेला नाही.

 

परीक्षा रद्द अन विद्यार्थ्यांचा गोंधळ

या घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत. त्यामुळे पवईतील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडालेली दिसून येत आहे.  दरम्यान एमपीएससी मार्फत होणाऱ्या आजच्या परीक्षा टीसीएस कडून रद्द आल्याची माहिती समोर येत असून परीक्षांबद्दलची पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे.

 

परीक्षा आजच घ्या..!

परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी शांततेत घरी जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच परीक्षांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती टीसीएस कडून देण्यात आली आहे. मात्र सध्या अनेक विद्यार्थ्यांकडून टीसीएस विरोधात घोषणाबाजी सुरु आहे. परीक्षा आजच झाली पाहिजे, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.