अनधिकृत हॉटेल-बार-पबवर पुन्हा कारवाईला जोर

तब्बल ५६ हजार चौरस फूट क्षेत्र केले मोकळे

0

 

पुणे | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे पोर्श प्रकरणाने राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. अपघातानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील ‘थ्री एल’ पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि राज्यात खळबळ माजली.

 

दरम्यान विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरल्यानंतर भानावर आलेल्या राज्य शासनाने पोलिस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला बेकायदा पब आणि बारसह हॉटेल्सवर कारवाईचे आदेश दिले आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील पबमधील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला बेकायदा पब आणि हॉटेल्सला बुलडोझर लावा, असे कडक आदेश दिले.

 

कारवाईसाठी बंदोबस्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस प्रशासनाने स्वतःहून पालिकेला कारवाई कोठे करायची अशी विचारणा करत बंदोबस्त देण्यास सुरुवात केल्याने कारवाईला गती मिळाली आहे. दरम्यान फर्ग्यूसन रस्त्यावरील हॉटेलमध्ये अमली पदार्थांचे सेवन झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेल, बार व पबवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

 

या हॉटेल बारवर केली कारवाई

 बाणेरमधील द कॉर्नर लांऊज वार, एमएल सिटोबार, ईस्को बार, इलीफट बार, ब्रीव्ह मार्चट कॅफे, उरबो किचन बार, नेटीव बार, द ज्यॉईस बॉय, फिलेमिट बार, श्रीमिस्टेक टर्स, मनाली बार, बालेवाडीतील डॉक यार्ड, कोरेगाव पार्कमधील ग्रेडमामस, दाबा शाब, निरंजन कवडे, प्रिम रेस्टोरेन्ट, टेल्ली बार, फर्क्युसन रस्त्यावरील सोशल हॉटेल आणि हडपसर-सासवड रस्त्यावरील काही हॉटेल्स, बारच्या साईड आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून तब्बल ५६ हजार ६१ चौ. फूट क्षेत्र रिकामे केले. दोन दिवसात महापालिकेने ९२९०६ स्क्वेअर फूट बांधकामांवर कारवाई केली आहे.

 

 

महापालिकेच्या बांधकाम विभागाने सलग तिसऱ्या दिवशी (गुरुवार) बाणेर-बालेवाडी, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर येथे कारवाई करून ५६ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे केले. या कारवाईदरम्यान बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जे. बी. पवार, उपअभियंता प्रकाश पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस. वाय. श्रीवास्तव यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.