वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातापदी प्रा.डॉ.सदानंद भिसे

डॉ. गिरीश ठाकूर यांची तडकाफडकी अलिबागला बदली : शासनाकडून बदलीचे आदेश

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आज अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. बदलीबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून डॉ. ठाकूर यांना तातडीने जळगावचा पदभार सोडला आहे. दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पदभार स्वीकारला होता. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून महाराष्ट्रातील काही अधिष्ठातांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार दि. २० रोजी काढण्यात आले आहेत. यात त्यांचाही समावेश आहे.

 

अधिष्ठातापदी प्रा. डॉ. सदानंद भिसे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रिक्त झालेल्या अधिष्ठातापदी महाराष्ट्र शासनाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश आज गुरुवारी काढण्यात आले.

 

डॉ. गिरीश ठाकूर यांची दीड वर्ष सेवा

डॉ. गिरीश ठाकूर यांनी सुमारे दीड वर्ष अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळला. डॉ. गिरीश ठाकूर यांना आता अलिबाग येथील मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. डॉ. गिरीश ठाकूर यांच्या कार्यकाळात चिंचोली येथील प्रस्तावित बांधकामाचे काम ५०% च्यावर पूर्ण झाले आहे. डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे आदराचे स्थान होते.

 

इतर ठिकाणीही बदली प्रक्रिया

जळगाव येथील अधिष्ठातापदी परभणी येथील शासकीय वैद्यकीय विभागाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव शंकर जाधव यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे येथील बीजे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी आता मुंबई येथील ग्रँड वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थीव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.